तळेगाव (श्या़पं़) : परिसरातील जवळपास ९० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे. गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यावर्षी तर सोयाबीनच्या शेतात अनेकांना गुरे सोडावी लागत आहेत़ काढणीचा खर्चही निघाला नाही. यामुळे यंदाचे सोयाबीन गुरांचा चाराच बनल्याचे दिसून येत आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकरी हतबल झाले आहेत़ नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाने यंदा शेतकऱ्यांना चांगलाच झटका दिला आहे. आता सोयाबीन काढणीसाठी लागणारा खर्चसुद्धा निघणे कठीण झाले आहे. पिकांचे सरासरी उत्पन्न अत्यल्प आहे. हेक्टरी एक ते दीड पोते उत्पादन होत असल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. अनेक शेतकऱ्यांनी छातीवर दगड ठेऊन सोयाबीन न काढता सोयाबीनच्या शेतात गुरे चरण्यासाठी सोडली आहेत. यावरून शेतकऱ्यांची विदारक स्थिती लक्षात येते़ सवंगणीलाही सोयाबीन परवडणारे नसल्याने गुरे चारण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे शेतकरी सांगत आहेत़ कपाशीला भाव मिळत नाही आणि खर्चही अधिक करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली होती़ नगदी पीक म्हणूनही सोयाबीन पूढे आले होते; पण त्याच सोयाबीनमुळे शेतकरी आणखी कर्जात बुडताना दिसत आहेत़ सध्या खरीपातून कुठलेही उत्पन्न न मिळाल्याने कर्जाचा डोंगर कायम आहे. जुनेच कर्ज थकित असल्याने नवीन कर्ज मिळण्याची शक्यताही कमीच आहे़आता शेतकऱ्यांना केवळ शासनाकडून मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानाचीच प्रतीक्षा असल्याचे दिसते़ झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत़ शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)
सोयाबीन ठरतेय गुरांचा चारा
By admin | Updated: November 17, 2014 22:59 IST