विवेक घळसासी : गीताई मंदिराचा ३६ वा वर्धापन दिनवर्धा : समाजासाठी ज्या शिक्षणाचा उपयोग होतो तेच खरे बुनियादी शिक्षण आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हेच बुुनियादी शिक्षण असल्याचे मत विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. हजारो शालेय विद्यार्थी व शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विनोबांच्या संकल्पनेतून ७ आॅक्टोबर १९८० मध्ये ३५ वर्षापूर्वी स्थापित करण्यात आलेल्या गीतार्ई मंदिर परिसराचा ३६ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन गिताई मंदिर प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले होते. गुरूकुल शिक्षण पद्धतीवर मार्गदर्शन करताना समाजाला ज्या ज्ञानाचा उपयोग होतो तेच खरे बुनियादी शिक्षण असल्याचे घळसासी यांनी सांगितले.विनोबाजींची गीतार्ई, गांधीजींचा चरखा आणि जमनालाल बजाज यांनी घेतलेले गोसेवेचे व्रत याचा त्रिवेणी संगम असलेल्या या गीताई मंदिरात त्यांच्या जीवन कार्याचा आढावा यावा म्हणून कमलनयन बजाज यांनी हे मंदिर उभारले. मंदिराला छत नाही, बंदिस्तपणा नाही, पुजारी नाही, मूर्तीपूजा नाही. विविध भागातून आणलेला दगड, त्यावर कोरलेले गीताईचे श्लोक अशी बनावट असलेले विनोबाजींच्या संकल्पनेतून हे आदर्श व प्रेरणादायी मंदिर तयार झाले आहे.प्रा. श्रीकांत झाडे यांच्या संचाने गीताईच्या अध्यायाचे सामूहिक गायन केले.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरी जिल्हा परिषदेत शिकत असणाऱ्या काजल राठोड हिने गीताईतील श्लोक पाठांतर करून उपस्थितांसमोर प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गीताईच्या पठन कार्यक्रमांमध्ये प्रेरीत करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिल कानकाटे, विजया व्यवहारे, अशोक तुरक्याल, प्रशांत दुधाने, जयश्री तोडकर, ललीता प्रधान, चारूलता जमाने, रफीक गफार शेख, मंगला तिजारे, अतुल सोनटक्के, सतीश काळे, किशोर सोनटक्के यांचा समावेश होता.कार्यक्रमास गांधी विचार परिषदेचे भरत महोदय, शिक्षा मंडळाचे सचिव भार्गव, डॉ. उल्हास जाजू, भुजंग वानखेडे, निसर्ग समितीचे मुरलीधर बेलखोडे, पवनार आश्रमाच्या भगिनी प्रवीणा बहन, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष जयवंत मठकर, अनिल फरसोले, बा. दे. हांडे, भाऊसाहेब थुटे, निवेदिता निलयमचे कार्यकर्ते, चंद्रशेखर दंडारे, विविध शाळांचे विद्यार्थी, तसेच शहरातील गणमान्य नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. संचालन डॉ. शोभा बेलखोडे, यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित सबके लिए खुला है, मंदिर ये हमारा, या गीताने व पसायदानाने केली.(शहर प्रतिनिधी)
समाजोपयोगी शिक्षण म्हणजेच बुनियादी शिक्षण
By admin | Updated: October 8, 2015 01:54 IST