जिल्ह्यात २४ तासांत अतिवृष्टी : २ हजार १७२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान; ३३५ गावांना फटकावर्धा : पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले़ नदी, नाल्यांना पूर असून घरांत पाणी शिरले़ अप्पर वर्धा प्रकल्पाने जलस्तर गाठला़ निम्न वर्धाचे ३१ गेट १ मीटरने उघडले असून अप्पर वर्धा १०० टक्के भरले़ यामुळे बुडित क्षेत्रातील ३७ तर निम्न वर्धांतर्गत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला़ जिल्ह्यात ३३५ गावांतील १६४२ घरांची पडझड झाली़ यात ६ हजार ५५३ व्यक्ती बाधित झाले़अतिवृष्टीमुळे कारंजा व आर्वी तालुक्यातील नदी व नाल्यांच्या काठावरील घरांत पाणी शिरले़ आर्वी ते तळेगाव तसेच अमरावती मार्गावरील नाल्याला पूर आल्याने काही काळ वाहतूक बंद होती. जिल्ह्यात २४ तासांत १५५.१५ मिमी पावसाची नोंद झाली़ वर्धा व आष्टी तालुक्यात २०० मिमी पाऊस पडला़ जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहे़ आर्वी तालुक्यात नांदोरा, शिरपूर व जळगाव येथील नाल्याच्या काठावर असलेल्या घरांत पाणी शिरले़ कारंजा तालुक्यातील सुसुंद्रा, बोटोना, पारधी, चिचोली, सावरवाडी, वाघेडा आदी गावांतील नाल्याच्या काठावरील ५० घरांत पाणी शिरले़ शिवाय तालुक्यातील १९३ घरांची अंशत: पडझड झाली़ यात कारंजा मंडळात ५६, सारवाडी ४९, ठाणेगाव ३३, कन्नमवारग्राम ४५ घरांची पडझड झाली़ यात ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ ६८ गावांतील शेतपिकांनाही फटका बसला़ बांध फुटल्याने शेती खरडून निघाली़ सततच्या पावसामुळे वर्धा, यशोदा, वणा, पोथरा, लाल नाला आदींसह नाले फुगले आहेत़ देवळी तालुक्यातील बोरगाव-आलोडा, सरूळ-वायगाव, देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा नदीच्या पुरामुळे दुपारपर्यंत बंद होती. लालनाला धरणाचे पाच दरवाजे उघडले असून पोथरा धरण ओव्हरफ्लो आहे़ वाघाडी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा-समुद्रपूर मार्ग सकाळी ४ तास बंद होता. मार्डा येथे नाल्याच्या पुरामुळे १० घरातील पारधी लोकांना प्राथमिक शाळेत हलविण्याची तयारी केली होती; पण पावसाने उसंत घेतल्याने प्रक्रिया थांबविण्यात आली़ डोंगरगाव, आसोला, कोरा परिसरातील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अतिवृष्टीने चारमंडळच्या ५० घरांचे अंशत: नुकसान झाले. अंतरगाव, घोरपड, चापापूर, वानरचुआ, सावंगी, लोखंडी, वाघेडा, सायगव्हान, धोंडगाव, समुद्रपूर, वायगाव (ह.), रेणकापूर, निंभा, बोडखा, मुरादपूर, पाइकमारी आदी गावांतील ४३ घरांचे नुकसान झाले. सेलू तालुक्यात केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)
आर्वी, आष्टी व वर्धा तालुक्यात धुव्वाधार
By admin | Updated: July 23, 2014 23:44 IST