वर्धा : नजीकच्या सेवाग्राम येथील अन्नासागर तलाव परिसरात बक-या चारण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. अविनाश राजेंद्र गोंडगे (१३) व अनुष्का राजेंद्र गोंडगे (१२, दोन्ही रा. आदर्शनगर सेवाग्राम), अशी मृतकांची नावे आहेत. बक-या चरण्यासाठी सोडल्यावर तलावाच्या काठावर खेळत असलेल्या अविनाश सुरूवातीला तोल जाऊन तलावात पडला. आपला भाऊ बुडत असल्याचे लक्षात येताच अनुष्काने त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले. अशातच तिही तलावात पडली. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांनी त्यांच्या चमूसह घटनास्थळ गाठले. कुणीतरी पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने सुरुवातीला अनुष्काला तलावाबाहेर जिवंत काढण्यात यश आले. त्यानंतर तिला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिका-यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. तर पोहण्यात तरबेज असलेल्यांच्या मदतीने अविनाशचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली आहे.
अन्नासागर तलावात भावाला वाचविताना बहिणीचाही तोल जाऊन मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 15:33 IST