सूतकताईने दिला महिलांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 09:35 PM2019-04-16T21:35:11+5:302019-04-16T21:35:35+5:30
येथील सेवाग्राम आश्रमात सूतकताई उपक्रम राबविला जात असून या उपक्रमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांच्या हाताला काम मिळत असल्याने त्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरातील कर्त्याला आर्थिक हातभार लावत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील सेवाग्राम आश्रमात सूतकताई उपक्रम राबविला जात असून या उपक्रमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. महिलांच्या हाताला काम मिळत असल्याने त्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरातील कर्त्याला आर्थिक हातभार लावत आहेत.
सेवाग्राम आश्रम ही गांधीजींची कर्मभूमी आणि प्रयोगभूमी राहिली आहे. याच आश्रमातून त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे काम केले. शिवाय महिलाही सक्षम व्हाव्या या हेतूने तेव्हापासून स्त्रीयांनाही चरखा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. बापूंनी सूतकताई आणि स्वदेशी असलेल्या खादीला विशेष महत्त्व दिले. मात्र सध्याच्या विज्ञान युगात ग्रामीण भागातून चरखा हद्दपार होत असल्याचे बघावयास मिळते. तर दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न मोठा होत आहे. याच बेरोजगारीवर मात करण्यासाठी सूतकताईचा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे. सेवाग्राम येथील आश्रमात असताना बापूंनी रचनात्मक कार्यक्रम आखले होते. त्यात सूतकताई, विनाई आणि कापड निर्मिती यांचा समावेश होता. त्यांच्या रचनात्मक कार्यक्रमाचा वारसा अजूनही आश्रमात जपला जात आहे. सूतकताईच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. हा उपक्रम पे्ररणा देणारा ठरत आहे.
दररोज मिळतात १६० रुपये
महादेवभाई कुटीमध्ये सूतकताईचे युनिट सुरु करण्यात आले आहे. यात दहा महिला सूतकताई करतात. सामान्य पणे दिवसाला एक महिलेला १५० ते १६० रुपये रोज पडेल इतक्या सूताची कताई करीत असल्याचे सांगण्यात आले.
महिलाच करतात कताई ते विणाई
कातलेल्या गुंड्यांवर कांची प्रक्रिया करून वाळविल्या जाते. बाँबीन मध्ये धागा भरून ताना भरल्या जातो. नंतर तो करघ्यावर लाऊन कपडा विनायी केली जाते. सूतकताई ते विनाई पर्यंतची सर्व कामे महिला करतात हे विशेष. काम वाढल्यामुळे यात दोन पुरुषांची वाढ करण्यात आली आहे.
खादीचे महत्त्व लोकांना पटले. खरेदीकडे लोक वळले आहे. महिलांच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याने इतर गावातही असा उपक्रम सुरु करता येईल. अशा स्त्रियांना व गटांना आश्रम प्रशिक्षण देईल. सरकार सौर ऊर्जा चरख्यासाठी मदत करण्यास तयार आहे. महिलांना सूतकताईतून रोजगार उपलब्ध झाला आहे, ही आनंदाची बाब आहे.
- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान.