वर्धा : प्राथमिक शिक्षक समितीची शिक्षणाधिकारी यांच्या कक्षात बैठक पार पडली़ यात प्राथमिक शिक्षकांच्या २०१३ व २०१४ या वर्षीच्या भविष्य निर्वाह निधीच्या विवरण पावत्या अल्पावधीत दिल्या जातील, अशी ग्वाही शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी दिली़ प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यास्तव महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींसह, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या दालनात शनिवारी बैठक घेण्यात आली. शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र गाडेकर यांच्या नेतृत्वात शिक्षक समितीचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. १९९० पासून सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांना स्थायी करणे, स्थायी करण्याबाबत नवीन ११ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे, २०१० ची सदोष बिंंदुनामावली दुरूस्त करणे, २०१३-२०१४ पर्यंतची आयकर २४ क्यू ची कारवाई पंचायत समिती शिक्षण विभागाद्वारे करणे, परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतनाच्या कपात रकमा सुरू करून यापूर्वी कपातीच्या जमा रकमांवर व्याज देणे अथवा समतूल्य रक्कम जमा करणे, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे, २४ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे, केंद्रप्रमुखांच्या दरमहा वेतनाची जबाबदारी मुख्याध्यापकांकडून काढून पंचायत समितीने देयके तयार करणे व केंद्रप्रमुखांच्या वैयक्तिक खात्यावर वेतन जमा करणे, मुख्याध्यापक, विषय शिक्षकांच्या संच मान्यता आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे वेतन काढण्यासंबंधाने होत असलेल्या अडचणीबाबत निर्णय घेऊन निर्देश देणे यासह अन्य विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्व प्रलंबित मागण्या प्राधान्याने सोडविण्याबाबत कारवाई केली जाईल, असे शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी सांगितले़ यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे महेंद्र भुते, गुणवंत बाराहाते, अतुल तळवेकर, प्रशांत निंभोरकर, श्रीकांत केंडे, आशिष बोटरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)
भविष्य निर्वाह निधी हिशेबाचे विवरण पत्र अल्पावधीत मिळणार
By admin | Updated: September 21, 2014 23:55 IST