आर्वी : दिवसेंदिवस विजेच्या वाढत जाणाऱ्या दरामुळे आधीच त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता नव्याने वीज वितरण कंपनीने अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली अतिरिक्त रकमेचे बिल पाठविले आहे. वीज वितरण कंपनीच्या या सुल्तानी वसुलीचा फटका सध्या ग्राहकांना सोसावा लागत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण आहे़घरगुती वीज ग्राहकांना या अतिरिक्त सुरक्षा ठेवीबाबत वीज वितरण कंपनीच्या परिपत्रकात नमुद असून १६ मे पर्यंत या सुरक्षा ठेवीची रक्कम ग्राहकांना भरायची आहे़ यात राज्य नियामक आयोगाने या संदर्भात एक परिपत्रक काढून भारतीय विद्युत कायद्याचे कलम ४७ अन्वये सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना महावितरणकडे सुरक्षा बिल भरणे बंधनकारक केले होते़ वर्षातील एका महिन्याचे सरासरी देयक सुरक्षा रक्कम म्हणून ग्राहकांना भरावयाची आहे़ ग्राहकांची सुरक्षा ठेव रक्कम ही सरासरी पेक्षा कमी असेल तरीही त्यांना सुरक्षा ठेव जमा करावी लागत आहे़ त्यामुळे जुन्या ग्राहकाकडून सुरक्षा ठेवीच्या नावाखाली बिल पाठवून वसुलीचे धोरण वीज वितरण कंपनीने सुरू केल्याने ग्राहकात नाराजीचे वातावरण आहे़ यातील नियमित बिलाबाबत ही अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले ग्राहकांना दिली जात आहे़ ती न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याची ताकीद दिली जात आहे़ सुरक्षा ठेव भरण्याबाबत होत असलेली सक्ती व सुरक्षा ठेवीच्या नावाखाली ग्राहकांना अतिरक्त रकमेची बिले दिली जात असल्याने वितरण कंपनीच्या या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. ग्राहकांच्या हितापेक्षा कंपनीचे हित जोपासत असल्याची सामान्य ग्राहकांची ओरड आहे़ग्राहकांनी आधीच सुरक्षा ठेव रक्कम भरलेली असते़ ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीसाठी वेठीस धरतांना त्यांच्या आधीच्या ठेवीवरील ९ टक्के व्याज मिळत आहे. ते देने बंधनकारक आहे. या व्याजाच्या रकमेतून सुरक्षा ठेव वसूल करून ती सुरक्षा ठेवीत जमा करावी़ अशी ग्राहकांची मागणी आहे. परंतु तसे न करता सामान्य ग्राहकांवरच सक्ती केल्या जात आहे़ (तालुका प्रतिनिधी)
ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक
By admin | Updated: May 11, 2015 01:38 IST