लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसल्याने मायलेकासह एका श्वानाचा मृत्यू झाला. ही घटना सिंदी (मेघे) भागातील वॉर्ड क्रमांक २ परिसरात गुरूवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. दीपाली सिद्धार्थ मेश्राम (४२) व रोहित सिद्धार्थ मेश्राम (२४) दोन्ही रा. सिंदी (मेघे), अशी मृतांची नावे आहेत. मृत दीपाली या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत.प्राप्त माहितीनुसार, दीपाली व दिपालीचा मुलगा रोहित हे घरी हजर होते. अशातच रोहीत याने कपडे प्रेस करण्यासाठी विद्युत प्रेस सुरू केली. अशातच पाळीव श्वानाला विद्युत प्रवाहित प्रेसचा जबर झटका बसला. ही बाब लक्षात येताच रोहीत याने श्वानाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशातच रोहितही चिकटला. मुलाला विद्युत प्रवाहाने ओढल्याचे लक्षात येताच आई दीपाली हिने आरडा-ओरड करीत रोहीतला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अशातच तिलाही विद्युत प्रवाहाने आपल्याकडे ओढले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मेश्राम यांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करून दीपालीसह रोहितला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेदरम्यान दीपालीचे पती सिद्धार्थ यांनाही विद्युत प्रवाहाचा झटका बसला; पण परिसरातील नागरिकांनी वेळीच विद्युत पुरवठा खंडित केल्याने ते थोडक्यात बचावले. सध्या त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचे सांगण्यात येते. या घटनेची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मायलेकासह श्वानाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST
रोहीत याने कपडे प्रेस करण्यासाठी विद्युत प्रेस सुरू केली. अशातच पाळीव श्वानाला विद्युत प्रवाहित प्रेसचा जबर झटका बसला. ही बाब लक्षात येताच रोहीत याने श्वानाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अशातच रोहितही चिकटला.
विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मायलेकासह श्वानाचा मृत्यू
ठळक मुद्देसिंदी (मेघे) परिसरातील घटना