सेवाग्रामला मिळणार पायाभूत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:08 AM2018-10-29T00:08:39+5:302018-10-29T00:11:16+5:30

महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले होते.

Sewagram will get the infrastructure | सेवाग्रामला मिळणार पायाभूत सुविधा

सेवाग्रामला मिळणार पायाभूत सुविधा

Next
ठळक मुद्दे१० कोटींची तरतूद : जिल्हा नियोजन समितीकडून ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यात वरुड व पवनार गावांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु बापूंची कर्मभूमी राहिलेले सेवाग्राम हे गाव या आराखड्यातून बाद झाले होते. त्यामुळे सेवाग्राम वासियांनी नाराजी व्यक्त करीत पाठपुरावा केला असता सेवाग्राम गावाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच १० कोटींची तरतुद करुन गावातील कामांचा प्राधान्यक्र म ठरवून ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला करण्यात आल्या आहे.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वरूड व पवनार या गावांसह सेवाग्राम आश्रमपर्यंतच्याच विकास कामांचा अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे आश्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेवाग्राम या गावातही पायाभूत सुविधा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. याबाबत सेवाग्रामवासीयांनी खासदार रामदास तडस आणि आमदार रणजित कांबळे यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करीत पायाभूत सुविधा देण्याची मागणी केली. तेव्हा या दोन्ही लोकप्रतिनिंधींनी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर सेवाग्राम गावातही पायाभूत सुविधांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सेवाग्राम ग्रामपंचायतने योजलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन सादर करण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीच्यावतीने सेवाग्राम विकास आराखडाचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार मे.अडारकर असोसिएट यांना दिल्या आहे. तसेच ग्रामपंचायतने १० कोटीच्या मर्यादेतील कामाचा प्राधान्यक्रम ठरवून ग्रामसभेचा ठराव घ्यावा. तसेच तो ठराव अंदाजपत्रकीय प्रस्तावासोबत सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे. या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडून सेवाग्राम ग्रामपंचायतलाही पत्र प्राप्त झाले असून आता कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता सेवाग्राम गावातही पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने गावाचाही कायापालट होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.
खासदार-आमदारांचा पाठपुरावा
खा.रामदास तडस यांनी वित्त व नियोजन मंत्री यांना सेवाग्राम येथे पायाभूत सुविधेसाठी ३४ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देण्याबाबत विनती केली होती. वित्त मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली होती. सेवाग्राम हे गाव आ.रणजित कांबळे यांच्या मतदार संघातील असल्याने सेवाग्राम विकास आराखडयात सेवाग्राममध्ये सहा कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्राद्वारे कार्यालयाकडे केली होती. या मागणीची निवेदने कार्यवाहीसाठी मे. अडारकर असोसिएट यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. यात सेवाग्राम ग्रामपंचायतकडून पायाभूत सुविधा कामाचे प्राधान्यक्रम ठरवावे. जागेची पाहणी करुन उपयोगिता प्रमाणे कामाच्या अंदाज पत्रकासह आराखडा शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात आले आहे.
पाठपुराव्याला आले यश
सेवाग्राममध्ये गांधीजींचे वास्तव्य आणि कार्य राहीले आहे. सेवाग्राम विकास आराखड्यामध्ये सेवाग्राम गावातील विकास कामांचा अंतर्भाव नव्हता. सरपंच रोशना जामलेकर, जि.प.सदस्य विजय आगलावे पं.स.सदस्य भारती उगले, उपसरपंच संजय गवयी व सर्व सदस्य आणि गावकऱ्यांनी हा प्रश्न लावून धरला होता. यासंदर्भात वेळोवेळी निवेदने दिली. मुंबईत खा.रामदास तडस यांच्या उपस्थितीत वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घेऊन मागणी केली होती.गावकऱ्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला होता. आता या कामाला यश आल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Sewagram will get the infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.