वर्धा : साटोडा ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या आलोडी येथील अपार्टमेंटचे सांडपाणी मोकळ्या जागेवर सोडण्यात आले आहे. डबके साचून दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने विविध आजार डोके वर काढत आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून कार्यवाहीची मागणी होत आहे. सुजीत पांडव हे मौजा आलोडी वॉर्ड क्रं. ५ मध्ये कुटुंबासह वास्तव्यास आहे. घरामागील ले-आऊटमध्ये वास्तू विश्व अपार्टमेंट झाले आहे. घराला लागून ले-आऊटमधील मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेवर सदर अपार्टमेंटमधील सांडपाणी सोडण्यात आले आहे. त्या अपार्टमेंटचे मालक व तेथील नागरिकांना याबाबत अनेकदा सूचना देण्यात आली; पण कुणीही ऐकून घेण्यास तयार नाही. यापूर्वी २ एप्रिल व २७ जुलै रोजी नालवाडी ग्रा.पं. मध्ये तक्रार केली; पण सदर अपार्टमेंटवर कुठलीही कार्यवाही केली नाही. सांडपाण्यामुळे खड्डा पडला असून दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना मलेरीया, हत्ती रोग, डेंग्यूसारख्या घातक आजारांनी त्रस्त केले आहे. यात एखाद्याचा मृत्यू होण्याची शक्यताही पांडव यांनी व्यक्त केली. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अपार्टमेंटचे सांडपाणी मोकळ्या जागेवर
By admin | Updated: October 10, 2016 00:55 IST