सोनेगावजवळील घटना : आजनसरा येथे स्वयंपाक घेऊन जाताना अपघातसेलू : नजीकच्या धानोली (मेघे) येथील लोहकरे कुटुंब मालवाहू वाहनाने श्रीक्षेत्र आजनसरा येथील संत भोजाजी महाराज मंदिरात पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन जात होते. दरम्यान, सोनेगावजवळ थांबलेल्या वाहनातून उतरून रस्ता ओलांडत असलेल्या बालकाला मागाहून आलेल्या भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात बालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. ईशांत सचिन लोहकरे (७), असे मृत बालकाचे नाव आहे.धानोली येथील सचिन लोहकरे यांनी श्रीक्षेत्र आजनसरा येथे पुरणपोळीचा स्वयंपाक ठरविला होता. तेथे जात असताना ईशांतचे आजोळ असलेल्या सोनेगाव येथून त्याच्या आजी-आजोबांना घ्यायचे होते. यासाठी वाहन थांबवून सर्व त्याच्या आजी-आजोबांना घेण्यासाठी जात होते. वाहनात बसून असलेला ईशांतही बेमालुमपणे वाहनातून उतरून रस्ता पार करीत होता. दरम्यान, मागाहून येणाऱ्या वायगाव येथील संस्कार जिनिंगमध्ये कामगार पोहोचविणाऱ्या ट्रॅव्हल्स एम.एच. ३२ क्यू. ३५९५ ने त्याला जबर धडक दिली. ट्रॅव्हल्सचे चाक त्याच्या पाठीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित सेवाग्राम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक मंगेश वाल्मिक फटींग रा. वायगाव याच्यावर अल्लीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)धानोली गावात शोककळामृतक ईशांतवर धानोली येथे दफनविधी करण्यात आला. यावेळी चिमुकल्याच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहून सर्वांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ईशांतला दोन बहिणी असून तो आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सात वर्षीय बालकाला ट्रॅव्हल्सने चिरडले
By admin | Updated: April 17, 2016 01:56 IST