वर्धा : राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणांचा निपटारा करावा, असे आवाहन प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष विभा कंकणवाडी यांनी केले.जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुने बार रूम येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमुख विभा कंकणवाडी यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या. मंचवार जिल्हा न्यायाधीश १ ए. एम. चांदेकर, जिल्हा न्यायाधीश २ एस.एस. अडकर, जिल्हा सरकारी अभियोक्ता ए. एच. सबाने, वकील संघाचे अध्यक्ष तथा अभियोक्ता पी. एम. देशपांडे यांची उपस्थिती होती.कंकणवाडी म्हणाल्या, राष्ट्रीय लोकअदालत सर्वांसाठी संधी आहे. या माध्यमाचा सर्वांनी उपयोग करायलाच हवा. या माध्यमातून श्रम आणि पैशाची बचत होते. लोकन्यायालयात विविध प्रकारची प्रकरणे तत्काळ मिटविली जातात. दुरावलेले संबंध प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी लोकअदालतीच्या माध्यमातून श्रम आणि पैशाचीही बचत होते. या माध्यमाचा लाभ सर्वांनीच घेण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन सहावे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर अमोलकुमार देशपांडे यांनी केले. आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव अ.शे. खडसे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)
लोकअदालतीतून अधिकाधिक प्रकरणांचा निपटारा करा
By admin | Updated: April 12, 2015 01:47 IST