वेतनाकरिता कर्मचारी संपावर : दोन दिवसात वेतन देण्याची अति. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची ग्वाहीवर्धा : गत तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. जिल्ह्यातील संपूर्ण २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाल्याने ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र मंगळवारी जिल्ह्यात होते. वेतनासह विविध मागण्या संदर्भात अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी आंदोलकांसह चर्चा केली. यावेळी त्यांनी इतर प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र वेतनाचा प्रश्न दोन दिवसात मार्गी काढण्यात येईल, अशी ग्वाही आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (२५७) जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे दिले. जिल्ह्यातील ६९ आरोग्य कर्मचारी सेवार्थ न झाल्यामुळे त्यांचे वेतन आठ दिवसात होईल, तर जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण यांनी इतर मागण्यांबाबत कार्यवाही झालेली असून मंजूर पदांचा प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचा प्रस्ताव तयार करून सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेकरिता पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन आंदोलन स्थळी येत डीएचओ चव्हाण यांनी केले. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाने, विभागीय सचिव नलिनी उबदेकर, रामचरण बुंदिले, विजय जांगडे, संजय डफळे, जिल्हा सचिव प्रभाकर सुरतकर निलिमा तातेकर, सुजाता कांबळे, अनुराधा परळीकर, सुहास कुंटेस यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सभेचा समारोप व आभार जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ तेलतुंबडे यांनी केले.(प्रतिनिधी)
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा ठप्प
By admin | Updated: June 24, 2015 02:10 IST