कारंजा (घाडगे) : बिज उत्पादन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालयाकडून बियाणे वाटपात दुजाभाव झाल्याची चर्चा असून, मर्जीतील काही लोकांना ते देण्यात आल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. शासनाने दिलेल्या या कार्यक्रमांतर्गत प्रति शेतकरी ४० किलो चना व २० किलो गहू बियाणे वाटप करायचे होते, हे बियाणे केव्हा आले आणि केव्हा वितरीत झाले याचा थांगपत्ताच शेतकऱ्यांना लागला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दलालामार्फत आलेल्या शेतकऱ्यांना बियाणे देत बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवल्याचा आरोप आहे. खतांचेही वाटप असेच करण्यात आले. एका गावासाठी आलेली खते, गुपचूपपणे एजंटामार्फत दुसऱ्या गावातील मर्जीतील शेतकऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. सन २०१४-१५ करीता मनरेगांतर्गत फळबाग लागवड कार्र्यक्रमामध्ये, तालुका स्तरावर ५११ लाभार्र्थ्यांची निवड झाली. ४२ ग्रामपंचायती मिळून इस्त्राईल पद्धतीने ४२८ हेक्टर मध्ये संत्रा लागवड झाली. ६.७ हेक्टर लिंबू, ३.६ हेक्टर मोसंबी, ६.७ हेक्टर आवळा, २.५० हेक्टर सिताफळ व ९.१० हेक्टरमध्ये आंबा लावलेला दाखविण्यात आला. खड्डे खोदले व इतर कामासाठी अनुदान देण्यात आले. पण बऱ्याच प्रमाणात हे अनुदान कागदोपत्रीच दाखवून घोळ झाल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कृषी विभागातर्फे बियाणे वाटपात दुजाभाव
By admin | Updated: November 29, 2014 01:57 IST