शेतकरी संकटात : उत्पादन घटण्याची शक्यता, परिसरातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणीआगरगाव : सध्या कपाशीची बोंडे परिपक्व होऊन कापूस काढणीचा काळ आहे. परंतु आगरगाव शिवारात कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कपाशीची हिरवीगार पाने लाल पडून वाळत आहेत. त्यामुळे यंदाही कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या खरीप हंगामात देवळी तालुक्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली. सध्या कपाशीची बोंडे परिपक्व होऊन कापूस वेचणीचा काळ आहे. त्यातच कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने रोपट्यांची पाती, फुले व लहान बोंडे करपली जात आहेत. हिरवीगार झाडे लाल पडून करपल्यासारखी दिसून येत आहे.लाल्याचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जी १०-२० बोंडे आहे, ती तेवढी शिल्लक आहे. त्यामुळे यंदाही उत्पादनात प्रचंड घट होऊन शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडणार असल्याचे चित्र असल्याने आगरगाव व परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.कृषी विभागाच्या निकषानुसार झाडांमध्ये नत्राची मात्रा कमी होत, रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. यामुळे हिरवेगार पीक लाल पडू लागते. झाडांची वाढ खुुंटते आणि पीक करपल्यागत दिसू लागते. परिणामी उत्पादनात घट येते. लाल्यावर आळा घालण्यासाठी पिकाला नत्राची मात्रा देण्याची गरज असते. ज्यांच्याकडे ओलिताची सोय असेल त्यांनी युरयाची मात्रा द्यावी. जिथे सिंचनाची सोय नसेल तेथे मॅग्रेशिअम सल्फेटची एक टक्का फवारणी करावी, तसेच रस शोषणाऱ्या किडीच्या नायनाटासाठी कृषी सहायकांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी असे कृषितज्ज्ञ सांगत आहेत. यंदा सोयाबीनवर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सोयाबीन पीकही हातचे गेले. आता कपाशीवर लाल्याने तोंड वर केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार असल्याने यंदाही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याचे दिसते.(वार्ताहर)
वेचणीच्या हंगामातच कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव
By admin | Updated: November 26, 2015 02:10 IST