प्रवेशातील अडसर : प्रमाणपत्रांच्या प्रकरणांचा पाऊसवर्धा : दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर पुढील प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. सर्वप्रथम विविध प्रमाणपत्रांकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे विद्यार्थी धाव घेतात; पण तेथून वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे. तीन ते चार दिवसांपासूनची प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांद्वारे रोष व्यक्त होत आहे. वर्धा उपविभागात देवळी-पुलगाव, सेलू आणि वर्धा या तालुक्यांचा समावेश आहे. तीनही तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्रांची प्रकरणे येत आहेत. यात तहसीलदार कार्यालयांतून आलेल्या प्रकरणांसह पालक, विद्यार्थी स्वत: घेऊन आलेल्या प्रकरणांचाही मोठा वाटा आहे. ही प्रकरणे निकाली काढताना उपविभागीय अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाकरिता महत्त्वाची ठरणारी ही प्रमाणपत्रे वेळेत होणे अपेक्षित आहे. गत तीन दिवसांपासून एसडीओ कार्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होत आहे. यातही प्रकरणे प्रलंबित राहत असल्याने प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, अशी भीती विद्यार्थी, पालक व्यक्त करीत आहेत. या प्रकारामुळेच एका युवकाने एसडीओ कार्यालयात शिवीगाळ करीत तोडफोड केली. सध्या जात, नॉन क्रिमीलेअर यासह अन्य प्रमाणपत्रांसाठी विद्यार्थी व पालक एसडीओ कार्यालयात ठिय्या मांडून असल्याचे दिसते. तहसील कार्यालयातून प्रकरणे त्वरित पाठविली जात नसल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक तहसीलदारांच्या सहीनंतर प्रकरण स्वत: घेऊन एसडीओ कार्यालय गाठतात; पण येथे ती स्वीकारली जात नाहीत. यामुळे त्यांना संताप अनावर होतो. गत तीन दिवसांपासून येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय याच बाबीमुळे चर्चेत आले आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी याकडे लक्ष देत विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळावे, याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालकांतून होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)वेळेवर आणली जाताहेत प्रकरणेदहावी, बारावीचे निकाल लागताच विद्यार्थ्यांनी जात, नॉन क्रिमीलेअर आदी प्रमाणपत्रांची प्रकरणे सादर करणे गरजेचे होते; पण तसे होताना दिसत नाही. विद्यार्थी व पालक वेळेवर प्रकरणे घेऊन येत आहेत. यामुळे प्रवेशाच्या वेळी त्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसते. गत १५ दिवसांत जेवढी प्रकरणे आली नाही तेवढी प्रकरणे गत तीन ते चार दिवसांतच प्राप्त होत आहेत. प्रवेशाचा दिनांक जवळ आल्यानंतर विद्यार्थी प्रमाणपत्रांसाठी प्रकरणे दाखल करीत असल्याने त्यांची तारांबळ उडत असल्याचे एसडीओ कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.प्रवेशातही होतोय विलंबगत काही दिवसांपासून प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने प्रवेश घेताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पालकांद्वारे सांगितले जात आहे. यामुळे त्वरित प्रमाणपत्र मिळणे गरजेचे झाले आहे.
एसडीओंकडे विद्यार्थ्यांच्या येरझारा
By admin | Updated: June 21, 2015 02:30 IST