नीलेश गायकवाड : सार्वजनिक वाचनालयातील कार्यक्रमवर्धा : अष्टपैलू व्यक्तींमध्ये सावरकर हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तित्व असल्याने या पुरूष सिंहाला केवळ राष्ट्रात बांधून ठेवणे योग्य नव्हे. कारण, जगातील ज्या कोणत्या राष्ट्रासमोर राष्ट्रभक्तीच्या उणिवांची जाणीव होईल, त्या राष्ट्रात राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे सावरकरांच्या राष्ट्रभक्तीने प्रभावित विचार जर पोहोचले तर ते राष्ट्र कितीही लहान का असेना; पण सशक्त, समृद्ध आणि सबल होऊन अमेरिकेसारख्या राष्ट्राशी टक्कर देऊ शकेल, असे मत शिवसंघ प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक व स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था नाशिकचे अध्यक्ष नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केले. येथील सार्वजनिक वाचनालयात राष्ट्रतेज युवा मंचद्वारे स्वा. सावरकर जयंती व युवामंचच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर नगर सहसंचालक डॉ. प्रसाद देशमुख, संस्कार भारतीचे विदर्भ प्रांतमंत्री आशुतोष अडोणी, राष्ट्रतेज युवा मंचचे शैलेश देहाडराय उपस्थित होते. युवा मंचद्वारे ‘ने मजसी ने’ हा सावरकर चरित्र गाथेचा सांगितिक कार्यक्रम पार पडला. डॉ. देशमुख म्हणाले की, सावरकरांवर अनुकलतेपेक्षा प्रतिकुलतेनेच अधिक प्रेम केल्याने यशवंत, किर्तीवंत होण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही; पण त्यांचे परिस्थिती सापेक्ष विज्ञानवादी विचार चिरंतन असल्यामुळे भावी काळात विज्ञान हाच राष्ट्राचा वेद झाला पाहिजे, असे म्हणणाऱ्या वस्तुनिष्ठ वैज्ञानिक सावरकरी विचाराचा तो विजय असेल. अनासक्त अज्ञेयवादी सावरकरांनी आपले संपूर्ण जीवनच नव्हे तर संपूर्ण परिवार भारतमातेच्या चरणी समर्पित केला. सावरकरांनी काही न करता केवळ साहित्यावर आपले लक्ष्य केंद्रित केले असते तर ते नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरले असते, असेही त्यांनी सांगितले.याचवेळी आयोजित ‘ने मजसी ने’ या चरित्रगाथेचे सांगितिक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात चरित्र गाथेचे समर्थ निरुपण आशुतोष अडोणी यानी करून श्रोतृवृदांची उत्तम दाद मिळविली. मातृभूमीच्या अनिवार ओढीने तळमळलेल्या अंत:करणाचा साक्षात्कार ज्या गीतातून झाला, ते ‘ने मजसी ने’ हे गीत आणि त्यावरील निरुपण ऐकताना सभागृह भारावले होते. अनादी मी अनंत मी, मला देवाचे दर्शन घेऊ द्या, जयोस्तुते आदी अनेक भावपूर्ण प्रसंगोचित गीते चमूने सादर केली. गीते सादर होत असताना गाथा निरुपणात अडोणी यांनी बुद्धी भेदातून समाजाला बाहेर काढल्याशिवाय हिंदुस्थान सक्षम व समर्थ होणार नाही, असे सांगितले. गीत सादरीकरणात प्रफूल्ल माहेगावकर, अमर कुळकर्णी, विनय मोडक, सायली मास्टे, गायत्री चिटणीस, अपूर्वा माहेगावकर, श्रीकांत पिसे, अमर शेंडे, मोरेश्वर दहासहस्त्र, विशाल दहासहस्त्र या कलावंतांनी गायकीसह वाद्यवृंदांची साथ केली. प्रास्ताविकात शैलेश देहाडराय यांनी युवा मंचची भूमिका व कार्य यावर प्रकाश टाकला. संचालन प्रेरणा लांबे यांनी केले तर आभार प्रचिती देशपांडे यांनी मानले. मान्यवराचा परिचय आकाश पत्की यांनी करून दिला. कार्यक्रमाला वर्धा नागरी बॅँक, अरुण केळकर, हरिभाऊ वझुरकर, महेश मोकलकर, राम काळे, माधव कोटस्थाने, डॉ. बोरकर यांच्यासह आकाश पत्की, अतुल देशपांडे, धनंजय बाराहाते, चारुदत्त हरदास, अमोल जोशी, वैभव बंडलकर, मेघजीत वझे, सचिन लिखीतकर, अटल पांडे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला शहरासह परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)आजपर्यंत ४२ हजार लोकांना अंदमान दर्शनवि.दा. सावरकर यांच्या अंदमान येथील कोठडीतील स्पंदने राष्ट्रभक्तीला पूरक प्रेरीत करणारी आहेत. यामुळेच किमान एक लाख नागरिकांना अंदमानदर्शन घडवायचे, असा संकल्प आम्ही केलेला आहे. यात आजपर्यंत ४२ हजार लोकांना ते दर्शन घडविले आहे. अंदमान भेटीनंतर यातील कित्येक लोक आता सावरकर विचार प्रचार कार्यात कार्यरत झाले आहेत. लवकरच अंदमानात सावरकर विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. यातून देशभक्तीने प्रभावित तरूणांची पिढी भारताला सावरकरी विचाराने महासत्तेचा देश करण्याचा प्रयत्न करणार असून तसा प्रयत्न होणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
सावरकर हे आंतरराष्ट्रीय व्यक्तित्व
By admin | Updated: May 30, 2016 01:51 IST