जिल्ह्यात ६७.१३ टक्के मतदान : उमेदवारासह कार्यकर्ते आकडेमोडीत व्यस्त वर्धा : जिल्हा परिषदेच्या ५० आणि पंचायत समितीच्या १०० जागांकरिता गुरुवारी मतदान झाले. जिल्ह्यात गट आणि गणाकरिता तब्बल ८१८ उमेदवार रिंगणात होते. झालेल्या मतदानाची अंतिम टक्केवारी जिल्ह्यात ६७.१३ एवढी राहिली. मतदान झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मततोजणीकडे लागल्या असून यात कोणाचा विजय होईल, याची गोळाबेरीज सुरू झाली असून अंदाज बांधण्यात सर्वच व्यस्त आहेत. जिल्ह्यात ७ लाख ३३ हजार ३३९ मतदारांची नोंद आहे. यापैकी ४ लाख ९२ हजार २९६ नागरिकांनी मतदनाचा हक्क बजावला. यात २ लाख ६३ हजार ७६७ पुरूष तर २ लाख २८ हजार ५२८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. झालेले मतदान हे उपलब्ध मतदरांच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी आणखी वाढली असती; मात्र याद्यांत झालेल्या घोळामुळे ही संख्या रोडावल्याची चर्चा जोरात होत आहे. मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना याद्यांत त्यांचे नाव दिसले नसल्याने अनेकांना परत जावे लागल्याचे चित्र आहे. मतदनाचा विचार केल्यास जिल्ह्यात सर्वाधिक ७४.५६ टक्के मतदान समुद्रपूर तालुक्यात झाले. तर सर्वात कमी वर्धा तालुक्यात झाले. येथे केवळ ५७.२९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदार याद्यांचा सर्वाधिक घोळ वर्धेतच झाल्याने ही टक्केवारी घसरल्याची चर्चा आहे. तर आर्वी तालुक्यात ६७.८७, कारंजा (घाडगे) ७२.७९, आर्वी ७०.०३, सेलू ६९.९८, देवळी ६९.२७ तर हिंगणघाट येथे ७१.७६ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची टक्केवारी मिळताच उमेदवारांकडून त्यांच्या विजय-पराजयाची गणिते मांडणे सुरू झाली आहे. ५० जिल्हा परिषदेपैकी काही जागांवर जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यात सर्वाधिक जागा वर्धा तालुक्यातील आहेत; मात्र येथेच सर्वात कती मतदान झाल्याने येथे अनेकांचे गणित बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात सर्वच जिल्हा परिषदेत चित्र अस्पष्ट असले तरी उमेदवारांकडून आपला विजय पक्का असेच बोलले जात आहे.(प्रतिनिधी) इव्हीएम कडेकोट बंदोस्तात वर्धा तालुक्यात मतदान झाल्यानंतर तालुक्यातील २०९ केंद्रावरील कंट्रोल आणि बॅलेट युनिट स्ट्रॉग रूम मध्ये कडेकोट सुरक्षेच्या घेऱ्यात ठेवण्यात आले आहेत. येथे एका रायफलधारी पोलिसाह चार कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी आहे. तर प्रत्येक मिनिटाची माहिती देण्यासह आपातकालीन माहिती देण्याकरिता खास वायरलेस संदेश यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे. तळेगावात चौकाचौकात वर्तविली जाताहेत भाकिते तळेगाव (श्या.पं.)- जिल्हा परिषद व पंचायत समितिरिता मतदान प्रक्रिया पार पाडली असून एकूण सात उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. येथे ६३ टक्के मतदान झाले असून २,७०९ पुरूष व २,३१३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये कोणता उमेदवार किती मताधिक्क घेवून विजयी होवू शकेल याबाबत चौका चौकात चर्चा रंगत आहे; परंतु नक्की कोण विजयी होणार हे निकालाअंतीच कळेल. विशेषत: तळेगाव येथे मतदानाच्या दिवशी सिडेट एक्सप्लोसिव्ह कंपनी, शाळा, कॉलेज व इतरही सर्व छोटे-मोठे उद्योग व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून सहकार्य केले.(वार्ताहर)
गोळाबेरीज सुरू; लक्ष निकालाकडे
By admin | Updated: February 18, 2017 01:27 IST