महावितरणची मनमानी : बिलावर जुन्याच नोंदी आष्टी (शहीद) : वीज वितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्याला ग्राहकांना वीज बील दिले जाते; पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने सध्या प्राप्त झालेले बील सर्वांना थक्क करणारे आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम आधीच जमा असताना ६० टक्के वाढ करून त्याचे वेगळे बील पाठविण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या या मनमानी कारभाराचे खापर ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवरून आदेश असल्याचे कंपनीचे अधिकारी सांगत आहेत. खासगीकरण झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने झपाट्याने वीज दरवाढ केली आहे. इंधन अधिभार, अतिरिक्त सुरक्षा ठेव या शिर्षकाखाली कसे लुबाडाचे यावर दोन-तीन महिन्यांत घडामोडी सुरू असतात. भारनियमनात कपात करून नियमित वीज पुरवठा सुरू असल्याने वापरही वाढला आहे; पण नियमित चार्जेस सोडून अवांतर अव्वाच्या सव्वा रक्कम लावण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. वीज कंपनीच्या नियमामध्ये दरवाढ करण्याचे करार असताना सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी केली जात आहे. नागरिकांना मार्च २०१७ चे देयक प्राप्त झाले आहे. यात दोन देयक देण्यात आले आहे. एका देयकावर अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम आहे. यामध्ये मागील वर्षी २०१६ मध्ये देखील सुरक्षा ठेव रकमेमध्ये ५८ टक्के वाढ केली होती. यावर्षी ६० टक्के वाढ करण्यात आली आहे. यासाठी कुठले प्रमाण वापरले, याबाबत विचारणा केली असता अधिकारी निरूत्तर होत आहेत. विजेचा जेवढा वापर केला, त्यावर इंधन अधिभार शुल्क आकारावे लागते. यात अधिकचे पैसे लावून बील पाठविले जात आहे. स्थीर आकार, वीज शुल्क यामध्येही अघोषित वाढ करण्यात आली आहे. ग्राहक नियमित बील भरत असतानाही प्रत्येक महिन्यात उशिरा देयक पाठवून मागील थकबाकी बिलात समाविष्ट करीत ४० ते ५० रुपये अधिक आकारले जात आहे. या तारखेपर्यंत भरल्यास एवढे व भरले नसल्यास एवढे, असा कारभार वीज कंपनी करीत आहे. सुरक्षा ठेव रकमेची वसुली केल्यानंतर बिलात त्याची नोंद केली जात नाही. जुन्याच नोंदी कायम दिसत आहेत. यामुळे वीज वितरण कंपनी उन्हाळ्याच्या दिवसांत पठाणी वसुली करण्यात मग्न असल्याचेच दिसते. याप्रकरणी कार्यकारी अभियंता निलेश गायकवाड यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. खासगीकरणामुळे वरिष्ठ पातळीवर ठरलेल्या धोरणात बदल होणे शक्य नाही, असे एकूणच चित्र दिसत आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या लुटीमुळे ग्राहकांत असंतोष पसरला आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या संतापाचा उद्रेक होण्यापूर्वी धोरणात बदल करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
अतिरिक्त ठेवीच्या नावावर लूट
By admin | Updated: May 1, 2017 00:33 IST