आष्टी (शहीद) : ग्रामीण भागाला शहरांशी जोडून दळणवळणाची समस्या सुटावी व गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात यावी म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. यात अनेक रस्त्यांचे भाग्य उजळले; पण कालांतराने निधीच नसल्याने या योजनेला घरघर लागली. गत दोन वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्तीच होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.आष्टी तालुक्यातील तेलाईमाता (पांढुर्णा चौक) ते किन्ही मोई हा एकूण नऊ किमी लांबीचा रस्ता २००४-०५ मध्ये १ कोटी ३१ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला. या रस्त्याचे काम साई कन्स्ट्रक्शन कंपनी यवतमाळाला देण्यात आले होते. सदर रस्त्याचे काम अत्यंत चांगल्या गुणवत्तेचे केले होते. डी.के. कन्स्ट्रक्शनचे संचालक दिलीप कटीयारी यांनी स्वत: रस्त्याचे काम करून घेतले होते. रस्त्याचा अर्धा भाग वनविभागाच्या हद्दीतून गेला आहे. त्यावेळी परवानगी घेऊन काम करण्यात आले. करारनाम्यामध्ये पाच वर्षे देखभाल व दुरूस्तीची कामे सोपविली होती. आता १० वर्षांचा कालावधी लोटला असताना रस्त्याची अवस्था चांगली आहे. केवळ एका पुलाजवळील कडा पावसाच्या पुरामुळे वाहून गेल्या. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या निर्माण होते. याची दुरूस्ती करण्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडे आहे; पण निधी नसल्यामुळे या रस्त्यांच्या डागडुजीची कामे करण्यात अडचणी येतात.रस्त्यावर किन्ही गावाच्या अलिकडेच पुलाजवळील एक साईड पुणत: पावसामुळे वाहून गेली आहे. दगड, मुरूमासह भूपृष्ठाला मोठा खड्डा पडला आहे. उतारावरून वाहन आल्यावर ते अपघातग्रस्त होण्याची भीती बळावली आहे. खालचा भाग खचल्याने डांबरी रस्ताही अधिकाधिक खचत चालला आहे. अर्धवट भागाचे कारपेट व सिलकोट उखडले आहेत. त्यांचीही दुरूस्ती करणे आवश्यक आहे. गत दोन वर्षांपासून निधीच नसल्याने देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासनाने याकडे लक्ष देत त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या रस्त्या प्रमाणेच तालुक्यातील पोरगव्हाण पंचाळा हा रस्ताही उखडत चालला आहे. सुजातपूर ते भारसवाडा रस्त्याचे बांधकाम झाले. त्याचेही साडेचार कोटींचे देयक निधीअभावी ठप्प पडले आहे. व्याजाचे पैसे आणून कंत्राटदाराने काम केले; पण शासनाने निधीच दिला नाही. यामुळे देयक रखडल्याची कबुली उपअभियंत्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या संपूर्ण नियमावलीसह चालणारी ही योजना निधीअभावी कोलमडत असल्याचे दिसते. लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून सदर योजनेला निधी मिळवून देणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)कर्जबाजारी होऊन केलेल्या कामांची देयकेही रखडली; दुरूस्तीलाही निधीचे वावडेआष्टी तालुक्यात किन्ही-मोई, पोरगव्हाण-पंचाळा, सुजातपूर-भारसवाडा, भिष्णूर-खडका असे तीन महत्त्वाचे रस्ते पूर्ण झाले आहेत. अधिक लांबीचे रस्ते यातून पूर्ण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र शासनाने ग्रामीण भागाला चांगल्या दर्जाचे रस्ते देऊन विकासाला चालना दिली आहे. यामुळे ग्रामस्थ समाधानी आहे.सुजातपूर-भारसवाडा-खडका-भिष्णूर रस्ता यावर्षी पूर्ण झाला. यातील साडेचार कोटी रुपये अद्याप प्राप्त झाले नाही. कंत्राटदाराने कर्जबाजारी होऊन काम पूर्ण केले. त्यामुळे या योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.किन्हीच्या पुलाजवळील रस्त्याची एक बाजू दरवर्षी पावसाळ्यामध्ये वाहून जाते. त्याची कायम दुरूस्ती करावी, अशी मागणी किन्हीचे उपसरपंच दिलीप झामडे, मोईचे सरपंच सुधाकर पवार यांनी शासनाकडे केली आहे.
निधीअभावी रस्त्यांची होतेय दुर्गती
By admin | Updated: September 27, 2015 01:40 IST