दोन महिने लोटले : शहरातील रस्त्याचा प्रश्नसेलू : सरकार कोणतेही असले तरी ते सारखेच असा प्रत्यय सध्या सेलू शहरवासी अनुभवत आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन होऊन दोन महिने लोटले. तरीही कामाला प्रारंभ झाला नाही. त्यामुळे या उद्घाटन फलकाचा काय अर्थ लावायचा, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. वर्धा-नागपूर महामार्गाला जोडून सैयद यांच्या आरामशीनपासून जुन्या न्यायालयासमोरून सौरंग पाते यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्यासाठी सात लक्ष रूपयांची तरतूद असल्याचे फलकावर लिहिले आहे. खा. रामदास तडस यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. या ठिकाणी जुना सिमेंट रस्ता आहे. पण तो खराब झाल्याने नगरसेवक शैलेंद्र दप्तरी यांनी खा. तडस यांच्याकडून हा रस्ता मंजूर केल्याचे सांगत कोणत्याही शासकीय बांधकाम विभागाकडून फलक न लावता भाजपा शहर अध्यक्ष वरूण दप्तरी विनित लिहून फलक लावला. पण १८ एप्रिलला लावलेला हा फलक केवळ भूमिपूजनापुरताच होता की काय, अशी शंका येथील नागरिकांना येऊ लागली आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटूनही काम सुरू झालेले नाही. या फलकावर खा. तडस, आ. पंकज भोयर, नगर पंचायत गटनेता शैलेंद्र दप्तरी, नगरसेविका कल्पना कळसाईत, प्रेमा जगताप, भाजपा तालुका अध्यक्ष अशोक कलोडे यांची नावे लिहून भूमिपूजन झाले. पण कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.(तालुका प्रतिनिधी)
भूमिपूजन होऊनही रस्त्याचे काम थंडबस्त्यात
By admin | Updated: June 22, 2016 02:07 IST