भाविकांना अडचण : रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणीपुलगाव : शहराच्या उत्तर सीमेवर मुंबई-हावडा रेल्वे मार्गालगत असलेले व विदर्भातील बहुसंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन कठीण माता देवस्थानाकडे जाणारा मार्ग मागील २० वर्षांपासून उपेक्षित आहे. या मार्गाची दुरवस्था झाल्याने मंदिरात जाताना भाविकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागतात.अश्विन व चैत्र नवरात्रात या मंदिरात मोठा उत्सव असतो. पुलगाव येथीलच नव्हे तर परिसरातील हजारो भाविक श्रद्धेने दर्शनाला, महाप्रसादाला मंदिरात येतात. या देवस्थानाकडे जाणारा मार्ग पूर्णत: उखडला आहे. त्यावरून दुचाकी वाहन चालविणे तर सोडा पायी चालणेही त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण करून भाविकांचा त्रास दूर करावा, अशी मागणी आहे. हे देवस्थान रेल्वे मार्गावर असल्याने दर्शनास जाणाऱ्या भाविकांना रेल्वे लाईन ओलांडून किंवा या ठिकाणी असणाऱ्या पुलाखालून जावे लागते. तत्कालिन आमदार प्रभाताई राव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून पुलगाव-वर्धा या राज्य मार्गापासून तर रेल्वेलाईनपर्यंत जवळपास एक किलोमीटर मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करून दिले होते. त्यामुळे दर्शनाचा मार्ग सुकर होऊन देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रिघ लागली; पण या मार्गाच्या आजूबाजूला व परिसरात असणारा खत कारखाना, गिट्टी खदान, थे्रशर आदींमुळे जड वाहतूक वाढून या मार्गाची लवकरच दुरवस्था झाली. परिणामी, भाविकांना या मार्गाने जाणे त्रासदायक ठरत आहे. दुसरा मार्ग म्हणजे रेल्वेलाईन ओलांडून जाणे असल्याने तोही धोक्याचाच आहे.जवळपास २० वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या या मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाविकांची व नागरिकांची गैरसोय होत आहे. शहर व परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावनेचा विचार करून संबंधित विभागाने या मार्गाचे चैत्रापूर्वीच डांबरीकरण करावे अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी) चैत्र नवरात्रापूर्वी डांबरीकरण व्हावेअवघ्या महिनाभरावर चैत्र महिना आला आहे. कठिण माता मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा होतो. शेकडो भाविक दररोज येथे दर्शनाला येतात. त्यामुळे चैत्र महिन्यापूर्वीच या मार्गाचे पक्के डांबरीकरण व्हावे अशी मागणी पुलगाव येथील भाविक करीत आहे. संपूर्ण विदर्भातून येथे भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे भाविकांच्या भावनेचा विचार करीत याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कठीण माता मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था
By admin | Updated: February 28, 2016 02:12 IST