नवरात्रौत्सवातही वाहने शहरात : भाविकांना अपघाताची भीतीवर्धा : शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून जड वाहतूक शहराबाहेरील बायपासद्वारे वळविण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात बंदी आहे. असे असले तरी नवरात्रोत्सवामध्ये शहरात रात्रीही भाविकांची मोठी गर्दी असते. यामुळे या दहा दिवसांसाठी शहरातील जड वाहतुकीला कायम बंदी घालणे गरजेचे झाले आहे. रात्री अवजड वाहने शहरातील मुख्य रस्त्याने भरधाव जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहतूक पोलिसांनी दहा दिवस तरी यावर निर्बंध लादणे गरजेचे आहे.नागपूर ते औरंगाबाद एक्स्प्रेस वे या रस्त्याच्या निर्मितीसोबतच शहरात बायपास मार्गाची निर्मिती करण्यात आली. या एक्स्प्रेस वे मुळे जड वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान चालणारे ट्रक, ट्रेलर, टँकर यासह विविध कंपन्यांना लागणाऱ्या अवजड साहित्याचे ट्रेलरही या मार्गाने धावू लागले आहेत. ही संपूर्ण जड वाहतूक शहरातून होऊ नये, अपघातांचा धोका निर्माण होऊ नये, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी वाहतूक विभागाद्वारे जड वाहनांना शहरात सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ही सर्व वाहने शहराच्या बाहेरून काढण्यात आलेल्या बायपास मार्गाने वळविण्यात आली आहेत. यामुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी झाले. शिवाय वाहतुकीतही बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. सध्या नवरात्रोत्सवाची धूम आहे. वर्धा शहरात मोठ्या उत्साहाने मातेची आराधना केली जाते. दुर्गोत्सव काळात जिल्ह्यासह अन्य गावांतील भाविक शहरात दाखल होतात. सायंकाळी ६ वाजतानंतर सुरू झालेली भाविकांची रेलचेल रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू असते. शहरातील बहुतांश दुर्गा उत्सव मंडळ मुख्य रस्त्याच्या आजू-बाजूला बाजारओळीमध्येच आहे. यामुळे मुख्य रस्त्यावरच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रात्री उशिरापर्यंत गर्दी राहत असल्याने जड वाहनांची वर्दळ अपघातास कारण ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवसभर शहरात न भटकणारी जड वाहने रात्री ९ वाजतानंतर शहरातून जात असल्याने वाहतूक विस्कळीत होते. यामुळे किमान नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत जड वाहनांना शहरात येण्यास पूर्णपणे मज्जाव करणेच गरजेचे झाले आहे. नवरात्रोत्सवाचे पाच दिवस दिवस पार पडले आहेत. शहरातील भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मुख्य रस्त्यावर यात्रा असल्यागत भाविकांच्या रांगा लागतात. शिवाय अनेक ठिकाणी अन्नदान कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिणामी, रस्त्यावर भाविकांच्या रांगा असतात. अशावेळी भरधाव चालणारी जड वाहने अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील आर्वी नाका, शिवाजी चौक ते बजाज चौक या मुख्य मार्गावर रात्री भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. ही गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी जागोजागी पोलिसांना कर्तव्यावर ठेवण्यात आले आहे; पण रात्री शहरातून होणारी जड वाहतूक अडविण्यात आलेली नाही. यामुळे धोका वाढला आहे. शहरातील रस्ते आधीच निमूळते झालेले आहेत. यातच रात्री दहा वाजेपर्यंत विविध वाहनांची रस्त्यावर वर्दळ असते. नवरात्रोत्सवात होत असलेली भाविकांची गर्दी, वाहनांची रहदारी आणि जड वाहतूक यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठा अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस यंत्रणेने नवरात्रोत्सव काळात शहरातील जड वाहतूक कायम बंदच करणे अगत्याचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे गरजेचे
अवजड वाहतुकीचा धोका
By admin | Updated: October 6, 2016 00:37 IST