आर्वी : समाज परिवर्तनाचा पाईक असलेला व ग्रामीण भागाशी सदैव आपुलकीची नाड जुळलेला, सांप्रत काळातील शिक्षक शासनाच्या नवनवीन ध्येय-धोरणामुळे पार हवालदिल झाला आहे. वाढत्या अशैक्षणिक कामामुळे अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम होत आहे. शिक्षकांवर अन्याय करणाऱ्या व संच मान्यतेने शिक्षकांचे भविष्य अंध:कारमय करणाऱ्या जी.आर. विरोधात शासनाच्या दरबारात शिक्षकांच्या समस्यांचा पाठपुरावा करणार, असे प्रतिपादन आमदार अमर काळे यांनी केले.स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालय येथे पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा आर्वी यांनी आयोजित केलेल्या गुणवंत व सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याला उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आर्वी पंचायत समितीचे उपसभापती प्रल्हाद नांदुरकर, वाठोडा जि.प.चे सदस्य गजानन गावंडे, संघटनेचे राज्य सरचिटणीस रमेश गोदे, केंद्र प्रमुख संजय बैस, पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव आदी उपस्थित होते. नांदुरकर म्हणाले, शिक्षकांकडे केवळ अध्यापनाचे कार्य सोपवून त्यांच्याकडील वाढती अशैक्षणिक कामे त्वरीत काढली पाहिजे. त्यासाठी पं. स. आर्वी स्तरावरून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. सत्कार कार्यक्रमाला उपस्थित इतरही मान्यवरांनी यावेळी आपली भूमिका विषद करीत शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक मेळाव्या यशस्वी करण्यासाठी किसन पाटीलपैक, रमेश जाधव, उमेश आसटकर, अविनाश टाके, मनोज सवाई, दिनेश हरणखेडे, प्रशांत गवळी, संदीप हिवसे, शरद हिवाळे, आत्माराम पाटील, लक्ष्मण बोरवार, दिलीप वनस्कर, गजानन पुरी, अरविंद पवार, दीपक बोराडे, विनोद पाटील, अनिकेत भुसारी, राहुल राजनेकर, सुभाष वऱ्हेकर आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. यावेळे सत्कार मूर्तींनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मेळाव्याला आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील शिक्षकांची तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)
वाढत्या शैक्षणिक कामामुळे अध्यापन कार्यावर परिणाम
By admin | Updated: January 24, 2015 23:00 IST