लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एक एप्रिल रोजीपासून राज्यात कोरोना निर्बंध हटविण्यात आलेले आहेत. मात्र, नागरिक बिनधास्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अजूनही कोरोनाचे रुग्ण मिळून येत असल्याने कोरोना अद्याप पूर्णपणे गेला नसल्याने विनामास्क फिरल्यास लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, आता पोलीस तसेच पालिका व महसूल प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक दहशतीत आले होते. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता निर्माण झाली होती. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आल्याने राज्यातील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वर्धा शहरातील नागरिक बिनधास्त झाले असून विनामास्क वावरताना दिसून येत आहेत. इतकेच नव्हे तर सोशल डिस्टन्सिंग काय आहे, हे देखील नागरिक विसरल्याचे दिसते. त्यामुळे गाफील न राहता सतर्क राहा, अन्यथा पुन्हा कोरोना आपले पाय पसरविण्यास सुरुवात करण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे हे विशेष.
जिल्ह्यात सध्या ३ रुग्ण
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागासह विविध विभागांना यश आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्येतही घट आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ ३ ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
सण, उत्सव धडाक्यात पण मास्क वापरून
आगामी काळात सण, उत्सवांची मेजवानी आहे. अशातच सरकारने कोरोना निर्बंध हटविले असल्याने सर्वकाही पूर्वीसारखे झाले आहे. मात्र, सण, उत्सव साजरे करताना मास्क लावायचा विसर पडू देऊ नका.अन्यथा लागण होण्याचा धोका आहे.
जिल्ह्यात ९३ टक्के लसीकरणजिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून ९३.३३ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ६८.९८ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच आतापर्यंत ८.२५ टक्के लोकांनी बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. अजूनही लसीकरण सुरुच आहे.
महसूल, पालिकेची कारवाई थंडावलीकोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता मागील दोन वर्ष महसूल विभागासह पालिकेच्या विविध पथकांनी तसेच पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, विनामास्क तसेच कोरोना नियमांचे पालन करणाऱ्यांवर कारवाई करीत दंड ठोठावला. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आल्याने पुन्हा विनामास्क वावर वाढला असताना कारवाई होताना दिसून येत नाही.