जागतिक महिला दिनानिमित्त महिला डॉक्टरांचा गौरववर्धा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने पारिचारिका प्रशिक्षण विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यात आरोग्य सेवा देणाऱ्या महिला डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. तर महिलांच्या स्वरक्षणाकरिता पोलीस विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘प्रतिसाद’ या मोबाईल अॅपची माहिती पोलीस उपनिरीक्षक ममता अफुणे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी होते. अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, महिला पोलीस अधिकारी ममता अफुणे, राधाबाई मेघे नर्सिंग विद्यालयाच्या मनिषा मेघे, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या डॉ. वावरे, नासरे, पाटील, मेट्रन पुनसे यांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मडावी म्हणाले, स्पर्धेच्या युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आहेत. स्पर्धेकरिता शिक्षण महत्त्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीने शिक्षण घेणे आवश्यक आहे. स्त्रीला शिक्षणासाठी प्रेरित करून प्रत्येक क्षेत्रात समानतेची वागणूक कृतीतून द्यावी. ममता अफुणे यांनी महिलांनी स्वरक्षणाकरिता त्यांनी आधुनिकतेची कास धरावी, असे म्हणत शासनाच्या ‘प्रतिसाद’ या मोबाईल अॅपची माहिती दिली. स्वसंरक्षणासाठी प्रत्येक युवतीने हा अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावा. तसेच संस्काराच्या शिदोरीतून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे विचार व्यक्त केले.
महिलांच्या स्वरक्षणासाठी ‘प्रतिसाद’ मोबाईल अॅप
By admin | Updated: March 9, 2016 03:00 IST