रोहणा : वडगाव (पांडे) येथील ग्रामस्थांनी वर्धा नदीवरील वडगाव, दिघी, सायखेडा परिसरातील चार रेतीघाटांचे लिलाव करू नये, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावासह निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. असे असताना या घाटांचे लिलाव २० जानेवारी रोजी होणार असल्याचे समजल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे़ वडगाव (पांडे) या गावाजवळून वर्धा नदी वाहते. या परिसरात नदीवर वडगाव, दिघी, सायखेडा व रिठगाव असे चार रेतीघाट आहेत. गावाच्या वरच्या भागाला निम्न व ऊर्ध्व वर्धा, अशी दोन धरणे आहेत. दरवर्षी सदर घाटांचे लिलाव होत असून रेती उत्खननामुळे नदीचे पात्र खोल झाले आहे. नदीची गावालगतची थडीही अत्यंत कमकुवत झाली आहे. पूर परिस्थितीत धरणातील पाणी नदी पात्रात सोडल्यास नदी पात्र बदलून गावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय रेतीच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीने गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरून वाहने तर दूरच शाळकरी मुले व वृद्धांना पायी चालणेही कठिण झाले आहे. सदर घाटांचा लिलाव होऊ नये म्हणून वडगाव पांडे ग्रा़पं़ ने १५ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामसभेत ठराव पारित केला. २३ नोव्हेंबर २०१४ रोजी उपविभागीय अधिकारी आर्वी यांनी घेतलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी पुन्हा घाटांचे लिलाव करू नये, असा ठराव मंजूर केला. यात रेती उपस्यामुळे नदी खोल होऊन परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करणे कठिण झाल्याचे नमूद आहे़ पावसाळ्यात गावात पाणी शिरल्यास अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली असताना लिलाव होत असल्याने रोष व्यक्त होत आहे़(वार्ताहर)
रेतीघाट लिलावाविरूद्ध ग्रामसभेत ठराव
By admin | Updated: January 18, 2015 23:16 IST