ग्रामस्थांची एकमुखी मागणी : व्यवस्थापन समिती व पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रारसेलू : केळझर येथील यशवंत हायस्कूलमध्ये भोंगळ कारभार सुरू आहे. यामुळे पालक त्रस्त असून विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. शिक्षण विभाग व संस्था संचालकांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी तसेच मुख्याध्यापकाची हकालपट्टी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारही करण्यात आली आहे.शाळेतील अव्यवस्थेबाबत काही पालकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या. यावरून शुक्रवारी उपसरपंच फारूक शेख, ग्रा.पं. सदस्य सुरेंद्र ठाकरे, ज्येष्ठ नागरिक सुधाकर मेश्राम, मिलिंद हिवलेकर, मनसे तालुकाध्यक्ष विलास दांडेकर यांनी शाळेला भेट दिली. प्रभारी मुख्या. पी.एन. येसनसुरे यांनी शिष्टमंडळाचे समाधान करणे सोडून त्यांना ‘गेट आऊट’ म्हणत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शिक्षिकेनेही धमकावणी केली. यामुळे वातावरण तापले होते; पण मान्यवरांनी समजदारी घेत प्रकरण हाताळत माघार घेतली.ही शाळा समस्यांचे माहेर बनली आहे. पोषण आहाराचा दर्जा निकृष्ट असून मेनूप्रमाणे आहार शिजत नाही. पोषण आहाराचे काम शाळा सुरू होऊन दोन महिने लोटले असताना बचत गटाकडे दिले नाही. विद्यार्थ्यांना आठवड्यात अनेकदा पिवळा भात दिला जातो. वरणाच्या नावावर पाणी दिले जाते. पालेभाजी दिसत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थी विहिरीवर जातात. तो आहार प्रांगणात बसून खावा लागतो. पोषण आहाराबाबत शिक्षण विभागाचे अधीक्षक फाटके यांनी भेट पुस्तिकेत ताशेरे ओढले आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी व मुख्याध्यापकाची हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
‘त्या’ मुख्याध्यापकाची हकालपट्टी करा
By admin | Updated: August 23, 2015 02:20 IST