जि.प. सीईओंना साकडे : अपंग शाळेतील कमचाऱ्यांचे निवेदन वर्धा : जिल्ह्यात अपंगांच्या मुक-बधीर, मतिमंद, अस्थिव्यंग, अंध अशा बारा अनुदानित शासनमान्य शाळा आहे. या शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित आहे. परिणामी, कर्ज काढून जगावे लागत आहे. याकडे लक्ष देत वेतन नियमित करावे, अशी मागणी करण्यात आली. याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांना निवेदन देण्यात आले. या शाळांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्याची जबाबदारी जिल्हा समाज कल्याण विभागाची आहे; पण समाज कल्याण विभाग दिरंगाईचे धोरण अवलंबित असल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन चार-चार महिने प्रलंबित राहते. परिणामी, कर्मचाऱ्यांना अकारण व्याजाचा भरणा करावा लागतो. गत अनेक वर्षे दसरा, दिवाळी या सणात वेतन नियमित होत नाही. शाळांकडून मात्र वेतनदेयके महिन्याच्या २३ तारखेपर्यंत सादर केली जातात; पण वेतन देयकाची पडताळणी व तपासणी वेळेवर होत नाही. वेतन नियमित होत नसल्याने कर्मचाऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. वेतनातील ही दिरंगाई दूर करावी, प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन अदा करावे, अशी मागणी विदर्भ अपंग शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष यशवंत झाडे, सीताराम लोहकरे, अशोक नागतोडे, नरेंद्र कांबळे, राजेंद्र राऊत, राहुल खंडाळकर, बागवान आदी उपस्थित होते. चर्चेला समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके उपस्थित होेते. मुख्याध्यापकांनी महिन्याच्या २३ तारखेपर्यंत वेतन देयके सादर करावी व ५ तारखेपर्यंत वेतन द्यावे, असे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी गुंडे यांनी दिलेत.(कार्यालय प्रतिनिधी)
वेतनातील दिरंगाई दूर करा
By admin | Updated: October 10, 2016 01:32 IST