लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामधील बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. आता शासनाकडून ऑनलाईन नोंदणी सुरू केली असून अद्यापही संकेतस्थळ उघडत नसल्याने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी रखडली आहे. याकरिता सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात येणाऱ्या कामगारांना योग्य माहिती न देता बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याने कामगारांची मोठी फरपट होत आहे.जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कार्यालयात भोंगळकारभार सुरु आहे. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत येथील कर्मचारीच अधिकाऱ्याच्या तोऱ्यात वावरत असल्याचा आरोप होत आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असून त्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकातील कामगारांपर्यंत पाहोचण्याकरिता त्यांची नोंदणी होणे गरजेचे आहे. म्हणून जिल्ह्याच्या सिमेवरील गावातील बांधकाम कामगारही वर्ध्यात नोंदणीकरिता येतात. आता कामगारांची नोंदणी ऑनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यासाठी संकेतस्थळही उपलब्ध करुन दिले आहे. मात्र जिल्ह्यातील कामगारांचा डाटा अद्यापही अपलोड झाला नसल्याने संकेतस्थळ उघडत नाही. अशा स्थितीत कामगारांची ऑफलाईन नोंदणी करता येतात, ती कार्यवाही कार्यालयाने पार पाडावी, अशी माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य सचिव क्षिरंगम यांनी दिली आहे. मात्र, याला जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून हरताळ फासल्या जात आहे. या कार्यालयाच्या बाहेरच मोठा फलक लावून २३ डिसेंबर २०१९ पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनिकरण तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभांचे अर्ज दाखल करणे व सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या आहेत. तरी बांधकाम कामगारांनी नमुद संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार अनेकांनी या संकेतस्थळाला भेट दिली असता काहीही प्रतिसाद मिळत नाही. आता आठ दिवसांपासून हाच गोंधळ असल्याने दूरवरुन येणाऱ्यांअसंख्य कामगारांना आल्या पावलीच परत जाण्याची वेळ आली आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मोकळीक असतानाही स्थानिक सरकारी कामगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून ती धुडकावून लावली जात असल्याची ओरड होत आहे. या कार्यालयातील ठाकरे नामक कर्मचाऱ्यांकडून कामगारांना नेहमीच त्रास होत असल्याने त्यांची या कार्यालयातून त्यांची बदली करण्याची मागणीही कामगारांनी केली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी यांकडे लक्ष देत ऑनलाईन संकेतस्थळ सुरु होईपर्यंत ऑफलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचीही मागणी होत आहे.
कामगारांची नोंदणी रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात येणाऱ्या कामगारांना योग्य माहिती न देता बाहेरचा रस्ता दाखविला जात असल्याने कामगारांची मोठी फरपट होत आहे. जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कार्यालयात भोंगळकारभार सुरु आहे. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत येथील कर्मचारीच अधिकाऱ्याच्या तोऱ्यात वावरत असल्याचा आरोप होत आहे.
कामगारांची नोंदणी रखडली
ठळक मुद्देकामगारांची दिशाभूल : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात भोंगळ कारभार