सदस्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन तळेगाव (श्या.पं.) : गावात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. लाच घेतल्याचा आरोप असलेला लिपिक शेंडे आपली मनमानी करीत आहेत. त्यामुळे या लिपिकास कामावरून कमी करावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहेकर यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आष्टी पं. स.चे गटविकास अधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार रामदारा वॉर्ड क्र. १ तसेच काकडधरा वॉर्ड क्रं. ५ व ६ मध्ये अनेक दिवसांपासून सार्वजनिक नळाला पाणी येत नसल्यामुळे पाण्याचा ठणठणाट आहे. मात्र सरपंच सुनिता जोरे यांनी यावर अद्यापही उपाययोजना केलेली नाही. तसेच चार महिन्यांपूर्वी ग्रामविकास अधिकारी पेठे याना लाच स्वीकारताना पकडले होते. तेव्हा सहआरोपी म्हणून ग्रा.प. कर्मचारी दशरथ शेंडे यालाही सहआरोपी केले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही शेंडे याला कामावर घेतले आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक पद्धतीने सुरू राहण्याकरिता शेंडे याला ग्रा.प.मध्ये कोणत्याही कामावर ठेवू नये अशी मागणी मोहेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. वॉर्ड क्र. ५ व ६ मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असुनही सरपंच जोरे याकडे दुर्लक्ष करीत आहे. सरपंचासह कर्मचाऱ्यांच्या मनमर्जीपणाने येथील ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. यामुळे वॉर्डातील नागरिकांच्या रोषाला सदस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोपही निवेदनातून केला आहे. शेंडे यास कामावरून कमी करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)
लाचखोर लिपिकास कामावरून कमी करा
By admin | Updated: December 28, 2015 02:37 IST