हिंगणघाट : येथील महसूल विभागाने पकडलेला अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेत असताना कोतवालाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली. कोतवालाला मारहाण करणाऱ्याला तातडीने पकडून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राज्य कोतवाल संघाच्या तालुका शाखेच्यावतीने तहसीलदार दीपक करंडे यांना निवेदन देण्यात आले.तालुक्यातील विविध रेती घाटावरील रेती चोरी रोखण्याकरिता महसूल विभागाच्यावतीने धडपकड मोहीम सुरू आहे. ४ डिसेंबर २०१४ रोजी तलाठी निनावे, खैरकार, इंगळे यांनी एक क्रमांक नसलेला ट्रॅक्टरला येणोरा जवळ पकडला. त्या ट्रॅक्टरला तहसील कार्यालयात नेताना टेंभा येथील कोतवाल पंढरी गेडाम यांना ट्रॅक्टरसोबत पाठविले. दरम्यान ट्रॅक्टर चालकाने गेडाम यांना शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. त्याच्या मोबाईलचे सिमकार्डही काढून घेतले. त्यामुळे गेडाम यांनी पायी जात हिंगणघाट तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना सविस्तर माहिती दिली. या घटनेची तहसीलदार कारंडे यांनी तातडीने दखल घेवून पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे; परंतु आरोपीला मात्र अद्याप पोलिसांनी अटक केली नाही. यावेळी संघटनेचे शाखा अध्यक्ष शुद्धोधन लभाने, उपाध्यक्ष शंकर कोसुरकार, सचिव शरद दारोंडे, पंढरी गेडाम, जगदीश मोरे, गजानन खानदेव, रविंद्र वैरागडे, आशिष करपाते, कमलेश धोटे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
रेती माफियाची कोतवालाला मारहाण
By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST