मोटारपंप निकामी : रबी हंगाम धोक्यात येण्याची शक्यतातळेगाव (श्या.पंत): वीज वितरण कंपनीकडून होणाऱ्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने शेतातील मोटरपंप सुरू होत नाहीत. अनेकदा वीज पुरवठा खंडित होत असल्याने मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात चकरा माराव्या लागत आहे. खंडित वीज पुरवठा व सातत्याने होणाऱ्या विजेच्या लपंडावाने शेतकऱ्यांचा रबी हंगामही धोक्यात आला आहे. परिसरात तळेगाव वीज वितरण विभागांतर्गत अनेक गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या रबी हंगामाला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. दुरूस्तीच्या नावाखाली वीज वितरण कंपनी जनतेवर भारनियमनाचा बडगा उगारत आहे. या अघोषित भारनियमानाने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. जुनोना, देवगाव, चिस्तूर, आनंदवाडी, भिष्णूर, खडका, बेलोरा, टेंभा परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सध्या शेतातील पिकांना मोटारपंपपाच्या सहाय्याने पाणी घ्यायला शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरातील विजेच्या उपाकरणांमध्ये वारंवार बिघाड येत आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने लाखो रूपये खर्च करून शेतात लावलेले मोटारपंप जळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. विजेचा कमी प्रमाणात वापर होत असतानाही वीज वितरण कंपनीकडून क्षमतेपेक्षा जास्त वीज बिल पाठविले जात असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांमधून होत आहे. एकीकडे वीज नसल्याने नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे जादा वीज बिलाचा भुर्र्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. शेतपिकांना सध्या सिंचनाची आवश्यकता आहे. दिवस रात्र कष्ट करून फुलविलेली पिके पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. शेतातील पिकांना पाणी देताना वीजपुरवठा कमी दाबामुळे केव्हाही खंडित होतो. कित्येक वेळानंतर तो सुरळीत होतो. वीज पुरवठा कधीही खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. वीजपुरवठा कधी सुरळीत होईल याची वाट पाहात अनेकदा दिवस निघून जातो. वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आहे.(वार्ताहर)
कमी दाबाच्या वीजप्रवाहामुळे रबीतील सिंचन प्रभावित
By admin | Updated: October 26, 2015 02:11 IST