विद्यार्थ्यांचा सहभाग : शासनाचा निषेधवर्धा : सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने शेकडो शेतकऱ्यांना कापूस खरेदी करुन गंडविले. मे २०१४ मध्ये २० हजार क्विंटल कापसाची खरेदी करून त्याचे पैसे न देता दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना आठ कोटी रूपयांनी गंडविले. या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी किसान अधिकार अभियान आणि महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांद्वारे शहरातील चौकाचौकात पथनाट्य, गीत व भाषणांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. सामान्यांना ही फसवेगिरी माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील शिवाजी चौक येथे जनजागरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे म्हणाले शेतकरी हितासाठीचा संघर्ष आपल्याला अधिक गतिमान करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आठ कोटींनी गंदवूनही सुनील टालाटुले हा समाजात राजरोसपणे फिरत आहे. राज्यशासन शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांचे घामाचे, हक्काचे पैसे ज्याने लुबाडले त्यालाच संरक्षण देत आहे. ही शेतकरी कष्टकरी, बहुजन समाजासाठी अत्यंत खेदजनक बाब असून राज्यशासनाचा जाहीर निषेध करीत असल्याचे काकडे यांनी भाषणात सांगितले.यावेळी सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नूतन माळवी म्हणाल्या, व्यापारी सुनील टालाटुले सारखे जातिवादी व्यापारी आपल्या देशात अजूनही आहेत ही दुर्दैैवाची बाब आहे. आर.एस.एस. व भाजपा सरकारच्या माध्यमातून विद्यार्थी, मजूर व शेतकरी यांच्यावर होणाऱ्या शोषणाची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम आम्ही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर गाणी सादर करीत शेतकऱ्यांच्या हक्कावर जनजागृती केली. संयोजक रामायण पटेल, डॉ. नीरज, राकेश चिली, संदीप भगत, आरती दिवाकर यांनीही विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात कपिल गोडघाटे, डिसेंट शाहू, सौरभ, श्रीनारायण, धिरज, मंगेश शेंडे, मयूर राऊत, पंकज सत्यकार यांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)
पथनाट्याद्वारे शेतकरी अन्यायावर जनजागृती
By admin | Updated: February 22, 2016 02:26 IST