लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काेविडशी लढा देण्यासाठी खासगी डॉक्टरांची वज्रमूठ बांधण्यात आली आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत खासगी डॉक्टर कोविडबाधितांना सेवा देणार असल्याने जिल्हा प्रशासनाचीही कोविड मृत्यू रोखण्यासाठी मदत होणार आहे.साडेतीन हजारांहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित जिल्ह्यात आहे. तर नवीन कोविडबाधित सापडण्याची गती वाढल्याने यात दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयांसह जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमधील रुग्णखाटा तसेच डॉक्टर अपुरे पडत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेता खासगी डॉक्टरांनीही कोविड युद्धात जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. याच आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात सध्या खासगी डॉक्टरांची वज्रमूठ बांधली गेली आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत खासगी डॉक्टर आता नियोजित दिवशी जिल्हा सामान्य रुग्णालयात ॲक्टिव्ह कोविडबाधितांवर उपचार करणार आहेत. कोविड-१९ विषाणूला हरविण्यासह जिल्ह्यातील काेविड मृत्यू रोखण्यासाठी प्रत्येक खासगी डॉक्टरांनी पुढे येत वैद्यकीय सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील तब्बल वीसहून अधिक खासगी डॉक्टर रुग्णालयात दाखल ॲक्टिव्ह कोविडबाधितांसह नवीन कोविडबाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढे आले आहेत. यामुळे आता जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा अद्ययावत होत नव्या जोमाने कोविडशी लढा देण्यासाठी सज्ज झाली आहे. खासगी डॉक्टरांच्या या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वच स्तरांतून स्वागत होत असून कोविडची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांनाही वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळणार आहे.
कोरोना संकटकाळात स्वयंस्फूर्तीने आले पुढेकोविड युद्धात एक योद्धा म्हणून प्रत्येक खासगी डॉक्टराने सहभागी होत कठीणप्रसंगी रुग्णसेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले. त्यानंतर खासगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत रुग्णसेवेसाठी आपली नावे आरोग्य यंत्रणेतील बड्या अधिकाऱ्याकडे नोंदविली. शिवाय आठवड्यातील काही दिवशी सेवा देण्याचे जाहीर केले आहे.