लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी/वडनेर : निसर्गकोपातून सावरल्यानंतर गुलाबी बोंड अळीचा सामना करीत पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असतानाच गुरुवारच्या पहाटे अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. यामुळे शेतशिवारातील कापूस भिजला असून तूर, चना व गव्हाच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. दिवसभऱ्याच्या ढगाळी वातावरणामुळे पुन्हा पावसाची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावला आहे.वर्धा तालुक्यासह देवळी, आर्वी व हिंगणघाट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आर्वी तालुक्याच्या काही भागात जवळपास तासभर पाऊस पडल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून तर पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. शेतातील कापूसही ओला झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. पहाटेच्या पावसाने शेतकऱ्यांनी दिवस निघतातच शेताकडे धाव घेऊन शेताली जनावरांचे वैरण झाकण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, जनावरांचे वैरणही ओले झाल्याने शेतकऱ्यापुढे नवीन संकट उभे ठाकले आहे. अशीच परिस्थिती वडनेर परिसरातही असल्याने कापूस, गहू, तूर व चना पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आज दिवसभर ढगाळी वातावरण असल्याने पिकांवर किडीचा प्रादुर्भावही वाढण्याची दाट शक्यता आहे. तसेच पुन्हा पाऊस येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता झळकत आहे. मागील चार वर्षांपासून शेतकºयांना सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने आता जगावे की मरावे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. देवळी तालुक्यातील चिकणी परिसरातही पावसाने दणका दिल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. पावसामुळे दिवसभर हवेत गारवा पसरला होता. शहरातील रस्तेही काही प्रमाणात सुनसान झाले होते. या थंडीचा अनेकांनी मजाही लुटला.
जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST
वर्धा तालुक्यासह देवळी, आर्वी व हिंगणघाट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आर्वी तालुक्याच्या काही भागात जवळपास तासभर पाऊस पडल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून तर पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका
ठळक मुद्देकापूस भिजला : दिवसभर होते ढगाळी वातावरण