खासदारांनी वाहिली आदरांजली : सर्वपक्षीय सभादेवळी : स्थानिक न. प. च्या निवडणुकीत प्रमोद शेंडे यांचा पराभव झाला होता. परंतु हा पराभवच प्रमोदबाबूंना मोठा करून गेला. त्यामुळे त्यांनी पराजयातूनच विजय मिळविला असे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. नगर परिषदेच्या वतीने सर्वपक्षीय सभेचे आयोजन करून माजी विधानसभा अध्यक्ष प्रमोदबाबु शेंडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी खा. तडस बोलत होते. न. प. सभागृहात आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी शंकर कापसे तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष शोभा तडस, प्राचार्या संध्या कापसे, न. प. उपाध्यक्ष विजय गोमासे आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम शेंडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खा. तडस म्हणाले. धडाडीचा निर्भीड नेता म्हणून त्यांची ख्याती होती. आमच्या गावाचा माणूस मोठा होत आहे. याचा रास्त अभिमान येथील लोकांना होता. पोळा, दसरा व इतर सणासोबतच शेती पाहण्यासाठी आले असता त्यांचा लोकांसोबत संवाद होत होता. देवळी न.प.च्या विकासात त्यांचा हातभार होता. लॉयड्स स्टील व लोअर वर्धाच्या उभारणीसाठी त्यांनी खूप परिश्रम घेतल्याचे तडस यांनी सांगितले. कापसे म्हणाले, प्रमोदबाबु कृषी क्षेत्रात पारंगत होते. बालपणापासूनच कुणालाही न भिणारे म्हणून त्यांची ओळख होती.याप्रसंगी नगराध्यक्ष शोभा तडस, प्राचार्य कापसे, हरिदास ढोक, सविता मदनकर, शरद आदमने, विश्वनाथ खोंड, राजेंद्र मसराम यांची भाषणे झाली.(प्रतिनिधी)
प्रमोद शेंडे यांनी पराजयातून विजय मिळविला
By admin | Updated: November 23, 2015 01:52 IST