सुधीर खडसे - समुद्रपूरस्थानिक पोस्ट कार्यालयात ढिसाळ कारभार सुरू आहे. यामुळे अनेक गावांतील खातेदार त्रस्त झाले आहेत. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचीही फरफट होत असल्याने असंतोष पसरला आहे. येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, शाळा, महाविद्यालये असून १० हजारांच्या वर लोकसंख्या आहे. लवकरच या ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतरही होणार आहे. यामुळे येथील शासकीय कार्यालयांच्या कारभारात सुसूत्रता येणे गरजेचे आहे. पोस्टाच्या कारभाराकडे संबंधितांनी लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मोठी लोकवस्ती असल्याने तसेच तालुक्याचे ठिकाण असल्याने येथील पोस्टाचे खातेदार अधिक आहेत; पण या खातेदारांना कार्यालयातील गलथान कारभारामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पोस्ट कार्यालयांतर्गत जिल्हा कार्यालयात प्रत्येक खातेदाराचे बचत खाते असून ठेवीचा व व्याजाचा हिशेब जिल्हास्तरावरून निघतो. बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवर दरवर्षी व्याज जमा होणे गरजेचे आहे; पण तीन ते चार वर्षांपर्यंत जमा रकमेवर व्याज जमा होत नसल्याची ओरड होत आहे. व्याजाकरिता ग्रामीण भागातील पोस्ट कार्यालय जिल्हा पोस्ट कार्यालयाकडे खाते पुस्तक व्याज नोंदीसाठी पाठविते; पण यावर्षी त्या पुस्तकात जमा करण्यात आलेले व्याज कोणत्या वर्षाचे आहे, याचे निदान लागत नाही. वास्तविक, दरवर्षी जमा रकमेवर व्याज जमा होणे गरजेचे आहे. दोन ते तीन महिन्यांनंतर खातेपुस्तक खातेदारांच्या हातात पडते, तेव्हा त्या पुस्तकात विविध प्रकारच्या घोडचुका आढळून येत असल्याचा आरोप खातेदार करीत आहेत. पोस्ट कार्यालयानेही आता संगणकीकृत कारभार सुरू केला आहे. यामुळे बचत खात्यावर संगणकाच्या माध्यमातून व्याजासह रक्कम जमा होते. यावर्षी बचत खातेदारांच्या रकमेवर काही वर्षांचे व्याज जमाच करण्यात आले नाही. सदर पुस्तक तपासले असता पुस्ताकातील नोंदी व संगणकातील नोंदी यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचेही आढळून आले. ही तफावत पोस्टाने गत काही वर्षांचे व्याज जमा न केल्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. संगणकातील जमा रकमेची खातेदारांच्या पुस्तकात यापूर्वी नोंद केली आहे; पण यात चुका आहेत. याकडे जिल्हा पोस्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात. शहरी भागातील लोकांचा कल पोस्टाकडे नाही; पण ग्रामीण भागात पोस्टाचे मोठे खातेदार आहेत. यात बचत खातेदार व निराधारांचाही मोठा समावेश आहे. या सर्व खातेदारांना चुकांचा त्रास सहन करावा लागत आहे. निराधार लाभार्थ्यांनाही वेळेवर मानधन दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे टपाल सेवा सध्या डोकेदुखी ठरू पाहत आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील पोस्ट कार्यालयाच्या कारभारात सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे कररण्यात येत आहे.
पोस्टाच्या कारभाराने खातेदार त्रस्त
By admin | Updated: October 18, 2014 23:46 IST