बसेस बंद होण्याच्या मार्गावर : बांधकाम विभागाचे दुर्लक्षविजयगोपाल : तांभा (येंडे), सावंगी, हिवरा या गावांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम अनेक दिवसांपासून रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे पाच वर्षांपासून पुलाचे काम प्रलंबित आहे. पूल न झाल्याने बस बंद होण्याच्या मार्गावर असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे.या पुलाच्या बांधकामासाठी तयार केलेल्या वळण मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे हा वळणरस्ताच धोकादायक ठरत आहे. या पुलावरही खड्डे पडल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असल्याने वाहन धारकांना रस्ता शोधताना तारेवरची कसरत करावी लागते. सध्या शाळा सुरू झाली असून पावसाळ्यात या पुलावर थोडा पाऊस आला तरी पुलावरून पाणी वाहायला सुरूवात होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या नुकसानाला सार्वजनिक बांधकाम विभागच दोषी राहील, असा आरोप विद्यार्थी करीत आहेत. या पुलावरून पाणी असल्यास तांभा, सावंगी, नांदगाव, कांदेगाव, हिवरा या गावांचा संपर्क तुटतो. यामुळे अनेक गावांतील शाळकरी मुले, शेतकरी व कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे.पुलाच्या बांधकामाकरिता पाच महिन्यांपासून साहित्य येऊन पडले आहे; पण अद्यापही काम सुरू झाले नाही. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान अटळ असल्याचे दिसते. शिवाय बसफेरीही बंद होण्याचा धोका आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत पुलाचे बांधकाम करून रस्त्याची डागडुजी करावी, अशी सरपंच निलम बिन्नोड व ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)
पूल बांधकामाचे भिजत घोंगडे
By admin | Updated: July 2, 2015 02:32 IST