रूपेश खैरी / प्रशांत हेलोंडे वर्धाशहरातील बाजारात गेल्यावर अव्यवस्थेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्या, पार्किंगच्या सुविधेअभावी कुठेही अस्ताव्यस्त उभी असलेली दुचाकी वाहने, दुकान मालकांची चारकाही वाहने यामुळे येथून पायी चालनेही कठीण होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व स्थितीवर आळा घालण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने काही रस्ते ‘वन वे’ केले होते; मात्र त्यांच्या या व्यवस्थेला त्यांच्याच विभागाकडूनच छेद दिल्याचे शनिवारी समोर आले. बाजारात येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये याकरिता पोलीस विभाग व नगर परिषदेत झालेल्या चर्चेतून मार्ग काढण्यात आला होता. यात दिवसाआड रस्त्याच्या एका कडेला पार्किंग करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. यामुळे रस्त्याची एक बाजू मोकळी राहत होती; मात्र आता त्या पार्किंगलाही ग्रहण लागले आहे. बाजारात रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी आहेत. ‘वन वे’ चा फलक असताना व्यवस्था निर्माण करणारे पोलिसच त्या फलकांना जुमानत नसल्याचे समोर आले आहे. पोलिसच या फलकांना नुमानत नसेल तर नागरिकांचे काय, असा प्रश्न समोर येत आहे. येथील अनाज लाईन परिसरातील ‘नो एन्ट्री’ असलेल्या फलकातून आत जात पोलीस विभागानेच नियमांना बगल दिल्याचे दिसून आले आहे. वर्धेकरांकरिता रोज गररजेच्या साहित्य खरेदीकरिता असलेल्या बाजार अतिक्रमणात हरविला आहे. दुकान मालकांनी त्यांच्या दुकानातील रस्त्यावर आणलेले साहित्य, चौरस्ता वा एखादा चौक पाहून फेरीवाल्याने लावलेल्या दुकानामुळे येथे नागरिकांना पायदळ चालनेही कठीण. नागरिकांना भाजीपाला मिळण्याकरिता पालिकेच्यावतीने सुरू केलेल्या टिळक भाजी बाजाराची दैना झाली आहे. बाजारात जाण्याचा रस्ता सोडून बाहेर हातगाड्यांसह दुकाने सजली आहेत. ही दुकाने रस्त्याच्या कडेला नाही तर रस्त्यावरच आली आहेत. सराफा लाईन, अंबिका चौक व पानाचंद चौकातही हिच अवस्था आहे. येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या फेरीवाल्यांमुळे बाजाराहाटाकरिता आलेल्या नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागत आहे.
बाजारातील वाहतूक व्यवस्थेला पोलिसांकडूनच छेद
By admin | Updated: August 23, 2015 02:10 IST