प्रभाकर शहाकार - पुलगाव (वर्धा)टपाल विभागात मृतक लाभार्थ्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली जाते़ हा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला़ याबाबत आरटीआय अंतर्गत माहिती मागितली असता टाळाटाळ करीत धमक्या दिल्या गेल्या़ यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे़पुलगाव कॉटन मील बंद झाल्याने बेरोजगार झालेले ६० वर्षीय रमेश नेवारे पोस्ट आॅफिससमोर बसून अशिक्षितांना पोस्टाचे, बँकेचे अर्ज भरून देतात़ यातूनच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हे करीत असताना त्यांना शासकीय योजनेत गैरप्रकार होत असल्याची कुणकुण लागली़ संपूर्ण माहिती मिळावी म्हणून रमेश नेवारे यांनी पोस्ट मास्तर अविनाश अवचट यांच्याकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज सादर केला; पण त्यांनी माहिती देण्यास नकार दिला़ यानंतर त्यांनी अधीक्षक मुख्य डाकघर व राज्य जनमाहिती अधिकारी वर्धा यांच्याकडे १६ मे २०१३ रोजी अर्ज सादर केला़ यावर पत्र क्र. के.बी-१/आरटीआय/१७/२०१३-१४ दि. १७ जून २०१३ अन्वये बचत बँक खात्याबाबतची माहिती अन्य व्यक्तीस देता येत नाही, माहिती अधिकारात कपोलकल्पित प्रश्नांना उत्तरे देण्याची तरतूद नाही, असे अधीक्षकांनी कळवून हात झटकले़ मुख्य डाकघरातूनही माहिती मिळत नसल्याने नेवारे यांनी २८ जून २०१३ रोजी अपिलीय अधिकारी, निदेशक डाकसेवा कार्यालय पोस्ट मास्तर जनरल नागपूर यांच्याकडे अपिल दाखल केले़ निदेशकांनीही १९ जुलै २०१३ रोजी पत्र देत समाधानकारक उत्तर दिले नाही़ दरम्यान, यातील मध्यस्थांमार्फत अर्जकर्त्या नेवारे यांनाच धमकावणे सुरू झाले़ याबाबत पोलिसात तक्रारी केल्या; पण अदखलपात्र गुन्हा नोंदवून पोलिसांनीही हात वर केले़ यामुळे घाबरून न जाता नेवारे यांनी थेट मुख्य आयुक्त केंद्रीय माहिती आयोग नवी दिल्ली यांच्याकडे ६ आॅगस्ट २०१३ रोजी अपिल दाखल केले़ केंद्रीय माहिती आयुक्त बसंत सेठ यांनी अपील स्वीकारून २१ नोव्हेंबर २०१४ ला एनआयसी जिल्हा केंद्र वर्धा येथे सुनावणीकरिता बोलविले़ दोन्ही बाजू ऐकून घेत त्यांनी माहिती देण्याचे आदेश जारी केले़ या पाठपुराव्यामुळे मृतक लाभार्थ्यांचे अनुदान पुर्ववत त्यांच्या खात्यात जमा झाले; पण ती रक्कम कुणी काढली होती, परत खात्यात कुणी जमा केली, मृतकांच्या खात्यातील रकमेचा असाच अपहार तर केला जात नाही ना यासह अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत़ यामुळे डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व अशा अन्य प्रकरणांची सखोल चौकशी करून सत्य शोधणे गरजेचे झाले आहे़ शिवाय यातील दोषी अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित मध्यस्थांवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे़
मृतकांच्या खात्यातून रकमेची उचल
By admin | Updated: February 1, 2015 23:02 IST