जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश : पुरवठा निरीक्षकामार्फत होणार तपासणींवर्धा : तहसीलदारांनी दरमहा किमान दोन पेट्रोल पंपाच्या तपासण्या कराव्या. तसेच प्रत्येक तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांची तपासणी पुरवठा निरीक्षकमार्फत करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिल्याची माहिती ग्राहक कल्याण परिषदेचे सचिव अजय भोयर यांनी दिली.पेट्रोलपंप धारकांकडून ग्राहकांना पैश्याच्या मोबदल्यात योग्य प्रमाणात पेट्रोलचा पुरवठा होत नसल्याबाबत व किमान मूलभूत सोयी, सवलती उपलब्ध नसल्याच्या तक्रारी ग्राहक कल्याण परिषदेकडे प्राप्त झाल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हा सचिव तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अजय भोयर यांनी पेट्रोल पंपाची तपासणी करण्याची तसेच ग्राहकांकरिता पेट्रोल पंपावर हवा यंत्र, अग्निशामक यंत्र, पिण्याच्या पाण्याची योग्य सोय, स्वच्छतागृह यासारख्या किमान मूलभूत सोयी उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतची खात्री करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप तपासण्याचे व पेट्रोल पंपावर किमान सुविधा उपलब्ध आहे किंवा नाही हे तपासण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव सवाई यांनी तहसीलदारांना दिले. तहसीलदारांकडून पेट्रोलपंपाच्या तपासण्या पारदर्शकपणे व्हाव्या, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.यावेळी उषा फाले, वनमाला चौधरी, स्वप्निल मानकर, श्याम अमनेरकर, मनोज दुधाळकर, सुमित गांजरे, रोहिणी बाबर, स्मिता बढिये, भालेराव, मनीष भोयर, मुलचंद चंदन, वंदना गावंडे, तिरभाने, प्रतिभा वाळके उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
तहसीलदार तपासणार दरमहा पेट्रोलपंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2015 02:40 IST