सरपंच मागणार न्यायालयात दादरसुलाबाद : स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच नारायध कुऱ्हेकर यांच्या विरूद्ध अविश्वास ठराव प्रस्तावित करण्यात आला होता़ सत्ता पक्षानेच आणलेला हा ठराव नऊ सदस्यांच्या उपस्थितीत पारित करण्यात आला़ या कारवाई विरोधात सरपंच न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले़ या कारवाईमुळे गावातील राजकारण ढवळून निघाले आहे़येथील सरपंच नारायण कुऱ्हेकर यांच्या विरूद्ध सात दिवसांपूर्वी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता़ सदर प्रस्ताव सत्ता पक्षातील ग्रा़पं़ सदस्यांनीच सादर केला आहे़ या अविश्वास प्रस्तावावर सोमवारी (दि़२४) चर्चा करण्यात आली. तहसीलदार मनोहर चव्हाणे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अविश्वास प्रस्तावाच्या सभेला ११ पैकी ९ सदस्य उपस्थित होते. यात उपसरपंच विलास खडके, ग्रा़पं़ सदस्य विजय सावरकर, नितीन धाडसे, महिला सदस्य उईके, गवारले, रघाटाटे, ढोले, धारगावे, मानकर आदी सदस्य उपस्थित होते. नोटीस न मिळाल्याने सरपंच नारायण कुऱ्हेकर व सदस्य हनिफ खा उपस्थित राहू शकले नाही. या सभेत झालेल्या कारवाईची माहिती प्रभारी ग्रामसेवक निमजे यांनी दिली़ त्यांच्या मते ठराव पारित झाला असून ठरावाची प्रत देण्यात येणार असल्याचे सांगितले़ अविश्वास प्रस्तावाबाबत सरपंच नारायण कुऱ्हेकर यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वसनीवर संपर्क साधला असता मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हे माझे विरूद्ध रचलेले षडयंत्र आहे. यासाठी मी न्यायालयात दाद मागणार आहे, असे सांगितले़ मला जनतेने गावाचे कार्य करण्यासाठी निवडून दिले आहे, भ्रष्टाचारासाठी नाही़ शिवाय मला नोटीस पाठविलेली नाही. त्यामुळे उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले़गावातील या घडामोडीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे़ सत्तेतील ग्रामपंचायत सदस्यांनीच सरपंचावर अविश्वास प्रस्ताव काम आणला, असा प्रश्नही ग्रामस्थांद्वारे उपस्थित केला जात आहे़ आता गावातील विकास कामे होणार की नाही, ग्रामपंचायतीचा कारभार कोण सांभाळणार, ग्रा़पं़ सदस्यांच्या मतेच ग्रामपंचायतीची कामे केली जातील काय, आदी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे़ आता काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़(वार्ताहर)
सरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव पारित
By admin | Updated: November 26, 2014 23:11 IST