रवींद्र कदम : नवजीवन योजनेचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबिरवर्धा : जनतेनी सामाजिक बांधिलकी जपून पोलीस विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमास सहकार्य करावे. पारधी समाजाला समजाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांचा विकास करावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर रवींद्र कदम यांनी केले.वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालय व विभागाद्वारा अवैध दारूविक्री करणाऱ्या पारधी समाज बांधवांच्या व्यवसायाचे पुनर्वसन करून समाजात सन्माने जीवन जगण्यासाठी नवजीवन योजना राबविण्यात येते. या अंतर्गत एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.या कार्यक्रमात जिल्ह्यातील नामांकित उद्योजक, रुग्णालयाचे व्यवस्थापक, वसतीगृह अधीक्षक, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब तसेच इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान बोरगाव पारधी बेडा, आष्टी (शहीद) येथील फ्लोअर क्लिनर व धूपबत्तीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १३ प्रशिक्षणार्थींना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी पारधी समाज बांधवांनी तयार केलेले फ्लोअर क्लिनर जनतेने विकत घेण्याचे आवाहन केले. तसेच तयार केलेले फ्लोअर क्लिनर हे इकोफ्रेन्डली असून ते प्रभावी जंतूनाशक असल्याचे संचालक एमगिरी डॉ. काळे यांनी सांगितले. उपस्थितांना नवजीवन योजनेबाबत माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. पोलीस विभाग राबवित असलेल्या नवजीवन योजनेस जनतेने सहकार्य करून समाजापासून वंचित व उपेक्षित पारधी बांधवांना अवैध दारूविक्री व्यवसायाच्या दलदलीतून बाहेर काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.प्रशिक्षणार्थींनी तयार केलेले फ्लोअर क्लिनर सावंगी (मेघे) हॉस्पीटल व इतर सामाजिक संस्था तथा पोलीस विभाग खरेदी करीत असल्याबाबत पारधी बचत गटातील महिलांनी मनोगतात सांगितले. मंचावरील मान्यवरांच्या हस्ते नवजीवन योजनेसंबंधाने प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. संबंधित छायाचित्राचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास पोलीस विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहा. पोलीस निरीक्षक पी.टी. एकुरके यांनी केले तर आभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पराग पोटे यांनी मानले. यानंतर एमगिरीच्या तांत्रिक सहयोगाने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या वायफड बेडा येथील महिलांनी ए-१ फ्लोअर क्लिनर व बोरगाव पारधी बेडा यांनी क्लिनअप फ्लोअर क्लिनर व धुपबत्तीची दुकाने लावली होती. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी या उत्पादीत वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे दिसून आले. (स्थानिक प्रतिनिधी)
पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणावे
By admin | Updated: October 22, 2016 00:50 IST