भरपाईची मागणी : शेतकरी विवंचनेत आर्वी : तालुक्यातल टाकरखेडा येथील अरूण नागोराव मानकर या शेतकऱ्याच्या शेतातून बी. एस. एन. एल. विभागाच्यावतीने जेसीबीने केबल टाकण्यासाठी नाली खोदण्यात आली; परंतु या नालीचे खोलीकरण व्यवस्थित न झाल्याने संबंधित शेतकऱ्याच्या शेतात खोदलेल्या खड्ड्यातून पाणी वाहत असल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पीडित शेतकऱ्याने एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार टाकरखेडा येथे अरूण मानकर यांची २.४२ हेक्टर शेती असून आहे. या शेतालगत मे २०१५ रोजी भारत संचार निगमच्यावतीने जेसीबीने केबल टाकण्यासाठी नाली खोदण्यात आली. या शेतासमोरील नालीचे खोलीकरण व्यवस्थित न झाल्याने पाणी शेतासमोरून वाहून न जाता शेतामध्येच जमा होत आहे. परिणामी त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या शेतात सदर शेतकऱ्याने सोयाबीनची पेरणी केली आहे. आर्वी तालुक्यात आॅगस्ट महिन्यात झालेल्या पुरामुळे पिकांचे आधीच मोठे नुकसान झाले. मानकर यांच्यावर स्टेट बँक कृषी शाखचे तीन लाखांचे कर्ज आहे. त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत आहे. नुकसान झालेल्या शेतीचा तातडीने सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नुकसानामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न त्यांना भेडसावत असून यावर तोडगा काढण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
बीएसएनएलच्या चुकीमुळे शेतात तळे
By admin | Updated: August 29, 2015 02:18 IST