कारंजा (घा): तालुक्यातील ६० ग्रामपंचायतच्या ४० ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन बुधवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. तसेच त्यांचेकडे असलेल्या ग्रामपंचायतीचे शिक्के व कार्यालयाची चावी गट विकास अधिकारी पंचायत समिती कारंजा यांच्याकडे सोपविली आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतन त्रुटी दुर करणे, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरण्यात यावा, २० ग्रामपंचायती मागे १ विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, प्रवास भत्ता पगारासोबत ३००० रुपये करावा, सर्व संवर्गाकरिता बदल्यांचे धोरण समान ठेवावे, शासनाच्या चुकीमुळे कंत्राटी ग्रामसेवकांना वेळेवर आदेश न मिळाल्यामुळे पेन्शन योजनेचा लाभ देण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा आदी मागण्याकरिता आंदोलन पुकारले आहे. पण या आंदोलनामुळे ग्रामस्थांची विविध कामाकरिता व प्रमाणपत्रांकरिता गैरसोय होताना दिसुन येत आहे.ग्रामपंचायत स्तरावरील नरेगाची कामे असो वा रहिवासी प्रमाणपत्रे, जन्म मृत्यु दाखले, बि.पी.एल चे प्रमाणपत्र आदी कामावर याचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक कार्यालयाचे उंबरठे झिझवावे लागत आहे. शाळेला सुरवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे तयार करण्याकरिता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. शिवाय आता ग्रामपंचायत स्तरावरील सर्व प्रमाणपत्रे आॅनलाईन झाली असल्याने त्यावर ग्रामसेवक वा ग्रामविकास अधिकारी यांची स्वाक्षरी लागते. या कामबंद आंदोलनामुळे याचा फटका नागरिकांना बसत आहे याकडे वरिष्ठांनी लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांद्वारे केली जात गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)
ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामकाज ठप्प
By admin | Updated: July 5, 2014 01:13 IST