२७०० ते ३२०० चा दर : दिवाळीत बाजार समिती बंद वर्धा: दिवाळीच्या काळात जिल्ह्यातील कृषी बाजार समितीत सोयाबीन व कापूस येत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. यंदा मात्र तसे नसल्याचे वास्तव आहे. दिवाळीचे दिवस सुरू झाले असताना जिल्ह्यातील केवळ एकमेव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत केवळ १ हजार ४०० क्विंटल सोयाबीन आले आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आवक कमी असूनही सोयाबीनला मिळणारा भाव अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे. या बाजारसमितीत आलेल्या सोयाबीनला दोन हजार ७०० ते तीन हजार २०० रुपये क्विंटलचा दर मिळाला आहे. यामुळे यंदा सोयाबीनपासून शेतकऱ्यांना विशेष लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे पाहिले आहे. यंदा मात्र तसे होणार असल्याचे चित्र नाही. सोयाबीनवर आलेल्या पैशाच्या आधारावर कुटुंबाची दिवाळी साजरी करण्याची शेतकऱ्यांची आशा सध्या मावळली आहे. शिवाय सोयाबीन विकून त्यातून आलेल्या पैशावर रबी हंगामाची तयारी करण्याची मनीषा बाळगून असतो, मात्र यंदा तीही धुळीस मिळाली आाहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीपात कपाशीपेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक झाला आहे. सोयाबीनवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असताना निसर्गाच्या लहरीपणाचा त्याला चांगलाच फटका बसला. पाऊस उशिरा आल्याने पेरण्या उशिरा झाल्या. याचा विपरीत परिणात उत्पन्नावर झाला. वेळोवेळी पावसाने दिलेल्या दग्यामुळे सोयाबीनचा आकार ज्वारीच्या दाण्यासारखा झाला. यामुळे त्याला बाजारात दर मिळेल अथवा नाही याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. काही भागात उत्पन्न येणार नसल्याची स्थिती आल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची सवंगणी करण्याचेही टाळले आहे. काही ठिकाणी सोयाबीनची तोडणी करण्यात येत असल्याचे चित्र आहे. अशीच स्थिती कपाशीची आहे. पाऊस उशिरा आल्याने पेरण्याही उशिरा झाल्या. परिणामी दसऱ्याचा कापूस खरेदीचा मुहूर्त फसला. दिवाळीपूर्वी कापूस बाजारात येईल असे वाटत असताना यंदा तेही होत नसल्याचे चित्र आहे. दिवाळी तोंडावर आली असताना शेतातील कापूस अद्याप घरीच नसल्याने तो बाजारात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या कारणाने कापसावर दिवाळी करण्याची आशा मावळली आहे.(प्रतिनिधी)
केवळ १४०० क्विंटल सोयाबीनची आवक
By admin | Updated: October 21, 2014 22:55 IST