वर्धा : महसूल विभागाने शासनाकडे पाठविलेल्या सुधारित पैसेवारीच्या अहवालात आर्वी विधानसभा मतदार संघातील २९२ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे दाखवून बोळवण केली होती. ही बाब ‘लोकमत’ने सातत्याने उचलून धरली. अखेर प्रशासनाला जाग आली आणि आता या गावांची वस्तुनिष्ठ पैसेवारी काढण्याच्या कामात प्रशासन व्यस्त झाल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान भवनात वर्धा जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा एका बैठकीत घेतला. यासोबतच आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यांची पैसेवारी ५० च्या वर दाखविण्यात आल्याबाबत त्यांनी कृषी आयुक्त, वर्धा जिल्हा कृषी अधीक्षक आणि उपविभागीय कृषी अधिकारी व उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविली. या बैठकीत संबंधित तालुक्यांत सोयाबीनचे यंदा सरासरी उत्पन्न १० क्विंटलच झाले असतानाही या तालुक्यांची पैसैवारी ५० पेक्षा अधिक कशी, यावरून मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याची माहिती आहे. यावर कृषी अधिकाऱ्यांनी उत्पादन आणि उत्पादकता कमी असतानाही महसूल विभागानेच ५० च्या वर पैसेवारी दाखविण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. या अनुषंगाने मागील पाच वर्षांतील उत्पन्नाचा अंदाज घेऊन पैसेवारी जाहीर करायला हवी, असा मापदंड असताना महसूल विभागाने परस्पर पैसेवारी दाखविण्यावरही ताशेरे ओढल्याची माहितीही एका अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर दिली.(जिल्हा प्रतिनिधी)
प्रशासन काढणार वस्तुनिष्ठ पैसेवारी
By admin | Updated: December 18, 2014 02:00 IST