मतदार याद्यांतील घोळ : रात्री उशिरापर्यंत चालली मतदान प्रक्रियावर्धा : जि.प., पं.स. साठी गुरूवारी मतदान घेण्यात आले. मिनी मंत्रालयाची निवडणूक असल्याने उत्साह होता; पण यावर निवडणूक विभागाने पाणी फेरले. त्रूटीयुक्त मतदार याद्यांमुळे मतदारांना भटकंती करावी लागली. परिणामी, रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. असे असले तरी शेकडो मतदारांना मतदान करता आले नाही. मतदार जागृतीवर मोठा खर्च केला जात असताना याद्यांतील त्रूटी हा खर्च व्यर्थ ठरवित असल्याचेच पाहावयास मिळाले.वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.), कुरझडी (जामठा), बोरगाव (मेघे), सालोड (हिरापूर), सेवाग्राम येथील मतदान केंद्रांचा ‘लोकमत’ने आढावा घेतला. यात बहुतांश मतदारांना त्यांचे नावेच दिसत नसल्याच्या तक्रारी होत्या. वायगाव येथे उमेदवारांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या चिठ्ठ्या व आॅनलाईन साईटवरून काढलेला क्रमांक तथा प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील मतदार यादीमध्ये ताळमेळ बसत नव्हता. परिणामी, मतदारांना या केंद्रातून त्या केंद्रात भटकावे लागले. बोरगाव (मेघे) येथील यादीतही प्रचंड घोळ दिसून आला. येथील निर्मला पाचे व गणेश पाचे या मतदारांची नावेच यादीत सापडत नव्हती. त्यांना मतदार केंद्राच्या चार वेळा चकरा माराव्या लागल्या. दोन्ही केंद्रांमध्ये फिरून आल्यानंतर अखेर त्यांना नाव मिळाले. याबाबत हेमलता मेघे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली; पण ते उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनाही काही उमगत नसल्याने परत यावे लागले. सालोड (हिरापूर) येथील मतदान केंद्रांवरही हाच प्रकार घडला. येथे सुमारे २०० मतदारांना नावे सापडत नसल्याने तारांबळ उडाली. सेवाग्राम व वरूड येथील मतदान केंद्रांवरही हा प्रकार दिसून आला. सेवाग्रामच्या यशवंत महा. मतदान केंद्रावरील सुमारे १०० मतदारांना नावे सापडली नाही. यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. शिवाय वर्धा तालुक्यातील तळेगाव (टा.), सावंगी (मेघे), सेलू तालुक्यात झडशी यासह अनेक ठिकाणी मतदार याद्यांतील घोळामुळे मतदारांना वंचित राहावे लागले. शासनाकडून जागृती करीत मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न होत आहे; पण याद्या निकोप नसल्याने हे प्रयत्न विफल होत असल्याचे दिसते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार याद्याही वेळोवेळी ‘अपडेट’ करणेच अगत्याचे ठरत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
असंख्य मतदार वंचित
By admin | Updated: February 17, 2017 02:08 IST