चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रेमातून लग्न करण्याचा निर्णय घेतला... मात्र, कुटुंबियांनी विरोध केला...त्यानंतर प्रियकर-प्रेयसी नोंदणी पद्धतीने विवाह आटोपून घेतात. अशीच काहीशी नोंदणी पद्धतीच्या विवाहासंदर्भातील माहिती अनेकांनी ऐकली असेल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात प्रेमियुगलच नव्हे, तर चांगल्या कुटुंबातील अनेकांनी नोंदणी पद्धतीने विवाह आटोपून घेतले. मागील पाच महिन्यांत ५२ विवाह दुय्यम निबंधक कार्यालयात पार पडले आहेत. नोंदणी पद्धतीने विवाह लावल्याने प्रमाणपत्रही नवविवाहितांना वेळीच मिळाले.दिवाळीनंतर खरीप हंगाम येतो. त्यानंतर अनेक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती घरातील विवाह योग्य युवक-युवतींसाठी स्थळ बघण्याच्या कामाला लागतात. यावर्षीही जिल्ह्यातील अनेकांनी विवाहयोग्य स्थळे शोधून ठेवली. उन्हाळ्यात लग्नाचा बार आटोपून घेण्याचा निर्णय नववधू-वरांकडील मंडळींनी घेतला होता. मात्र, मार्च महिन्यांत देशासह राज्यात कोरोनाने एन्ट्री केली. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषीत केले.घरातून बाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे उन्हाळयात लग्नाचा बार आटोपून घेण्याचा निर्णय घेणारे चांगलेच अडचणीत आले. संपूर्ण एप्रिल महिना प्रत्येकांनी घरात राहूनच सुरक्षितता पाळली. मे महिन्यांत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. मात्र, थाटामाटातील लग्न समारंभावर बंदी कायम ठेवली. घरी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली. अनेकांनी नियमांचे पालन करीत घरी लग्न सोहळा पार पाडला. मात्र, अनेकांकडे घरी जागा नसल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य होत नव्हते. तर काही कुटुंबियांचे नातलग मोठ्या संख्येने असल्याने घरी विवाह आटोपून घेताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे त्यांच्यासमोर केवळ नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा हाच एकमेव पर्याय होता.मे महिन्याप्रमाणेच जून, जुलैत लग्न सोहळ्यांवर बंदी कायम होती. लग्नसराई लॉकडाऊनमध्येच आल्याने अनेकांनी नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात १६, मे महिन्यात १२, जून महिन्यात ५, जुलै महिन्यात ७ तर आॅगस्ट महिन्यात १२ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले आहेत.जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ४३ विवाह झालेतलॉकडाऊनपूर्वी जानेवारी महिन्यामध्ये या कार्यालयात १६ नोंदणी पद्धतीने विवाह पार पडले तर फेब्रुवारी महिन्यात २७ विवाह पार पडले. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर एप्रलि महिन्यांत एकही विवाह या कार्यालयात पार पडला नाही. मात्र, त्यानंतरच्या महिन्यांत नोंदणी कार्यालयात विवाह पार पडल्याने गर्दी होती.अनेकांनी उडविला जिल्हा सीमेवरच बारलॉकडाऊन असल्याने जिल्हाबंदी करण्यात आली आहे. ही जिल्हाबंदी आजही कायम आहे. अशातच मार्च आणि मे महिन्यात बाहेरगावी असलेल्या वधू-वरांनी कशाचीही तमा न बाळगता थेट जिल्हा सीमेवर येत एकमेकांच्या गळयात वरमाला घालून पोलिसांना मामा बनवून लग्नाचा बार उडविला. काहींनी तर थेट ऑनलाईन पद्धतीने आपला विवाह उरकविला. यामुळे अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. कोरोना संकटामुळे यंदा विवाह उत्सवावरही विरजण पडले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
नो बॅण्डबाजा, बरात ओन्ली रेशीमगाठींची झाली ‘नोंदणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 05:00 IST
घरातून बाहेर निघण्यावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे उन्हाळयात लग्नाचा बार आटोपून घेण्याचा निर्णय घेणारे चांगलेच अडचणीत आले. संपूर्ण एप्रिल महिना प्रत्येकांनी घरात राहूनच सुरक्षितता पाळली. मे महिन्यांत जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. मात्र, थाटामाटातील लग्न समारंभावर बंदी कायम ठेवली. घरी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी दिली. अनेकांनी नियमांचे पालन करीत घरी लग्न सोहळा पार पाडला.
नो बॅण्डबाजा, बरात ओन्ली रेशीमगाठींची झाली ‘नोंदणी’
ठळक मुद्दे५२ जोडप्यांचा नोंदणी पद्धतीने विवाह : लॉकडाऊन काळात विवाह सोहळ्यांवर होती बंदी, आता नियम व अटींवर मिळतेय परवानगी